coronavirus: "ऑगस्टपर्यंत लसीचा प्रभाव दिसून येणार, देशातील कोरोनाच्या फैलावाला असा ब्रेक लागणार’’ एम्सच्या माजी संचालकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 09:24 AM2021-04-06T09:24:01+5:302021-04-06T09:27:20+5:30
corona Vaccination in India : कोरोनाच्या संसर्गाचा हा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे.
नवाी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Coronavirus in India) कोरोनाच्या संसर्गाचा हा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारकडून लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे माजी संचालक एम.सी. मिश्रा यांनी कोरोना लसीकरण (corona Vaccination) आणि कोरोनाच्या संसर्गाबाबत मोठे विधान केले आहे. ( "The effect of the Corona vaccine will be felt from August, the spread of corona in the country will come to a halt," the Former AIIMS director M. C. Mishra claimed )
एम्सचे माजी संचालक डॉ. एम. सी. मिश्रा यांनी सांगितले की, हल्लीच अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार मास्कच्या वापरामुळे कोरोनाचा फैलाव झालेल्या भागात संसर्गाच्या दरात वेगाने घट होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत मास्क हा कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी प्रभावी आहे. मास्कच्या वापरामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होण्याबरोबरच मृत्युदरसुद्धा कमी होईल.
त्यांनी सांगितले की, हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित झाले आहे. ज्या ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर करण्यात आला नाही. त्या ठिकाणी दर एक लाख लोकांमागे ६४३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. तसेच तिथे मृत्युदरही अधिक होता. तर जिथे मास्कचा सक्तीने वापर केला गेला तिथे एक लाख लोकांमागे केवळ ६२ रुग्णच सापडले. त्यामुळे मास्कचा वापर करण्याबाबत सक्ती आवश्यक आहे, असेही डॉ मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान, देशात सुरू असलेले कोरोनाविरोधातील लसीकरण आणि त्याच्या प्रभावाबाबतही डॉ. एम. सी. मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की, देशामध्ये आतापर्यंत सुमारे सात कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये लसीचे दोन डोस खूपच कमी लोकांना देण्यात आले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यामुळे संसर्गापासून बचाव आणि त्याचा प्रभावही दिसून येईल.
तर एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी सांगितले की, देशात सद्यस्थितीत प्रत्येक १०० लोकांमधील सुमारे पाच जणांनाच कोरोनावरील लस देण्यात आली आहे. जोपर्यंत लोकसंख्येतील मोठ्या वर्गाला लस दिली जात नाही तोपर्यंत हर्ड इम्युनिटी विकसित होणार नाही.