CoronaVirus: भारताचा विकासदर येणार एक टक्क्याच्या खाली; फिचचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 03:14 AM2020-04-24T03:14:48+5:302020-04-24T07:10:54+5:30
दोन तिमाहींमध्ये अर्थव्यवस्थेचा होणार संकोच
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसणार असून, चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) एक टक्क्याहून कमी (०.८ टक्के) राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षी हा दर ४.९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला गेला होता.
फिच या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने गुरुवारी आपले विविध अर्थव्यवस्थांच्या वाढीबाबतचे सुधारित अंदाज जाहीर केले. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था दोन तिमाहींमध्ये संकोचण्याची शक्यताही वर्तविली आहे. या संकोचामुळेच वर्षभराचा विचार करता अर्थव्यवस्थेचा विकासदर ०.८ टक्के असा राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा अनुक्रमे (-) ०.२ आणि (-) ०.१ टक्के असा राहण्याचा अंदाज फिचच्या अहवालात व्यक्त झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला मोठाच फटका बसला आहे. आर्थिक वर्षाच्या नंतरच्या दोन तिमाहींमध्ये विकासदर वाढून अनुक्रमे १.४ आणि ४.४ टक्के राहण्याची आशा आहे. यामुळेच संपूर्ण वर्षाचा विकासदर हा ०.८ टक्के राहील, असेही अहवालात मांडले आहे.
ग्राहकांकडून होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता असून गुंतवणुकीमध्येही कपात होण्याचा अंदाज आहे. यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास कमी होणार आहे. मागील वर्षी ग्राहकांनी एकूण अर्थव्यवस्थेच्या ५.५ टक्के खर्च केला होता. यावर्षी मात्र हा खर्च केवळ ०.३ टक्क्यांवर येण्याची भीती फिचने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीचे प्रमाण घटून ३.५ टक्के येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. पुढील वर्षामध्ये (२०२१-२२) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाजही या अहवालामध्ये व्यक्त केला आहे.
जगाचा जीडीपी ३.९ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज
कोरोना व्हायरसचा फटका जगातील सर्वच देशांना बसणार असल्याने जागतिक अर्थव्यवस्थाही ३.९ टक्क्यांनी कमी होणार असल्याची शक्यता फिचने व्यक्त केली आहे. या संस्थेचे मुख्य आर्थिक सल्लागार ब्रायन कोल्टन यांनी सांगितले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला बसणारा हा सर्वात मोठा फटका असेल.
२००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीपेक्षाही यावेळी होणारे नुकसान मोठे असणार आहे. जगभरातील उभरत्या अर्थव्यवस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर घट होण्याचा अंदाजही या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. भारत आणि चीन या दोन्ही अर्थव्यवस्थांचा विकासदर एक टक्क्याच्या खाली गेल्याने त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होण्याचा वेग वाढला आहे.