कोरोनाच्या काळजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 12:44 PM2020-03-04T12:44:51+5:302020-03-04T12:59:51+5:30
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे.
नवी दिल्ली : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'होली मिलन' कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे. जगभरातील तज्ज्ञ सांगत आहेत की, कोरोना व्हायरस (COVID-19) टाळण्यासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, मोठ्या संख्येने लोक एकत्रित केले जाऊ नयेत. यासाठी यावर्षी कोणत्याही होळीच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.
Experts across the world have advised to reduce mass gatherings to avoid the spread of COVID-19 Novel Coronavirus. Hence, this year I have decided not to participate in any Holi Milan programme.
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2020
दरम्यान, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या 21 पैकी 15 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत ठेवण्यात आले आहे.
कालपर्यंत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 6 होती. त्यात आता इटलीहून आलेल्या 15 पर्यटकांची भर पडल्याने हा आकडा 21 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 6 भारतीयांना कोरोनाचा संसर्ग झाला. यामधील तीन जण केरळचे असून या सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाले आहेत.
दुसरीकडे, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीची उपाययोजना सुरू केल्या आहेत. 3 मार्च किंवा त्याआधी व्हिसा जारी करण्यात आलेल्या इटली, इरान, दक्षिण कोरिया आणि जपानच्या नागरिकांना भारतात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजदूत, संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, ओसीआय कार्डधारक यांना मात्र यामधून वगळण्यात आले आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय चाचण्यांनंतर भारतात प्रवेश दिला जाणार आहे.