CoronaVirus Effect: खासगी बँका, कंपन्यांकडून कार्यालये सोडण्यास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:19 AM2020-05-21T02:19:35+5:302020-05-21T02:20:03+5:30
झोमॅटो कंपनीने आपल्या कर्मचारीवर्गापैकी १३ टक्के लोकांना जसे नव्या नोकºया शोधण्यास सांगितले आहे, तसेच १५०पैकी १२५ कार्यालये बंद करण्याचा निर्णयही या कंपनीने घेतला आहे.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे बँकांपासून ते स्टार्ट-अप कंपन्यांच्या कार्यालयांतील बहुतांश कर्मचारी आता घरातूनच काम करत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला कंपन्यांनी कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागा आता रिकाम्या करण्यास सुरुवात केली आहे. खर्चात कपात करण्यासाठी हा मार्ग अवलंबण्यात आला आहे.
झोमॅटो कंपनीने आपल्या कर्मचारीवर्गापैकी १३ टक्के लोकांना जसे नव्या नोकºया शोधण्यास सांगितले आहे, तसेच १५०पैकी १२५ कार्यालये बंद करण्याचा निर्णयही या कंपनीने घेतला आहे. झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी १,१०० कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार आहे. तसेच किचन व कार्यालयांवरील खर्चही कमी करणार आहे.
इंडसइंड बँकेने मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आपल्या कार्यालयांपैकी काही जागा रिकाम्या केल्या आहेत. कार्यालयांसाठी जागा भाड्यावर घेण्यासाठी होणाºया खर्चात कपात करण्याचे या बँकेने ठरविले आहे. क्युअरफिट या कंपनीने ८०० कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या व्यावसायिक केंद्रांची संख्या कमी करण्याचे या कंपनीने ठरविले आहे.
आयटी कंपन्यांची उद्योगविषयक संस्था असलेल्या नॅसकॉमने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, लॉकडाऊनच्या काळात २५०पेक्षा अधिक स्टार्ट-अप कंपन्यांनी सध्या आपले काम थांबविले आहे किंवा कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यालयांवर आपला सर्वाधिक खर्च होत असल्याने त्यात कपात करण्याचे काही कंपन्यांनी ठरविले आहे. सध्या कर्मचाºयांनी पूर्णवेळ किंवा काही प्रमाणात आपले काम घरातूनच करावे असा इ-मेल एका कंपनीच्या सीइओने आपल्या कर्मचाºयांना पाठविला आहे.