coronavirus: संपूर्ण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये; अमरनाथ यात्रेवर प्रश्नचिन्ह कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:18 AM2020-07-05T03:18:36+5:302020-07-05T03:19:06+5:30
यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे; पण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये गेल्याने तिथे पोहोचण्यातच अनेक अडचणी आणि अडथळे येणार आहेत.
-सुरेश डुग्गर
जम्मू : बांदिपोरा जिल्ह्याचा अपवाद करून संपूर्ण काश्मीर खोरे रेड झोनमध्ये असल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमरनाथ यात्रा २१ जुलैपासून सुरू होते. यंदा या यात्रेच्या काळात पूजेच्या वेळी कोणाला उपस्थित राहता येणार नाही, असे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून होणार आहे.
यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे; पण काश्मीर खोरेच रेड झोनमध्ये गेल्याने तिथे पोहोचण्यातच अनेक अडचणी आणि अडथळे येणार आहेत. शिवाय यात्रेच्या काळात भाविकांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून कसे वाचवता येईल, या विचाराने प्रशासन चिंतेत
आहे.
सध्या काश्मीरमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू असतानाच तो भूभाग रेड झोनमध्ये आला आहे. केवळ बांदिपोरा आॅरेंज झोनमध्ये आहे. अन्य राज्यांतून येणाऱ्या वाहनांवर ३१ जुलैपर्यंत निर्बंध कायम आहेत आणि रेल्वे वा विमानाने येणाऱ्यांना ७ ते १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहण्याचे बंधन आहे.
त्यामुळे यात्रेत सहभागी होता येणे बाहेर राज्यांतील लोकांना अवघड असेल. अशा वेळी केवळ दर्शनासाठी भाविक येतील का, असा प्रश्न आहे.
यात्रेचा काळ दोन आठवडेच
गुरूपौर्णिमा (५ जुलै) ते श्रावण पौर्णिमा (३ आॅगस्ट) या काळात अमरनाथ गुंफेमध्ये होणाºया पूजेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनचे पथक तिथे दाखल झाले आहे.
अमरनाथ मंदिर व्यवस्थापन समितीची बैठक लवकरच होणार आहे. त्यात यात्रेचे स्वरूप ठरविण्यात येईल.
यंदा यात्रा २३ जुलै ते ३ आॅगस्ट याच काळात ठेवावी, असा विचार सुरू आहे. तसेच बालाटालमार्गे यात्रा चालू शकेल.