Coronavirus : दुकानदार अन् भाजीवाल्यांना मिळणार ई-पास; घरोघरी पोहोचवलं जाणार सामान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 02:23 PM2020-03-25T14:23:22+5:302020-03-25T14:31:25+5:30
किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं.
नवी दिल्लीः देशात कोरोनानं अक्षरशः कहर केलेला आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण ५६०च्या वर गेले असून, आतापर्यंत या जीवघेण्या रोगानं ११ जण दगावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. रात्री सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांबाहेर गर्दी पाहायला मिळाली. किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं. त्यावर आता दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनं तोडगा काढला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या दुकानदार आणि भाजीपाला विकणाऱ्यांना ई-पास देण्याची घोषणा केली आहे. लोकांनी घरातच थांबावे आणि दुकानांबाहेर गर्दी करू नये. तसेच लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण काल पाहिलं, त्यानंतर अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं बंद करण्यात येणार नाहीत. मी जनतेला पुन्हा सांगू इच्छितो की, घाबरून सामान खरेदी करू नका. अत्यावश्यक सामानाचा कोणताही तुटवडा नाही. अत्यावश्यक सामान विक्रेत्यांना ई-पास देण्यात येणार आहे. जे कोणी आपली दुकानं आणि कारखाना उघडणार असतील, त्यांना ई-पासची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
Delhi CM Arvind Kejriwal: We will issues passes for those providing essential services, E-passes will be provided to those who need to open their shops and factories for these services https://t.co/VOaYgGbLnT
— ANI (@ANI) March 25, 2020
कोणत्याही समस्येसाठी हेल्पलाइन जारी
कोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. जर कोणालाही काही त्रास असल्यास हेल्पलाइन नंबर- 23469536 कॉल करून अडचण सांगावी.
दिल्लीतल्या संक्रमितांची संख्या ३१वर
आरोग्य विभागानुसार, मंगळवार संध्याकाळी दिल्लीत कोरोना संशयित सापडला आहे. त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली असून, रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आरोग्य विभागानं रुग्णाचे तपासणी अहवाल पुन्हा पडताळून पाहण्यासाठी पुण्यातील आयसीएमआर लॅबमध्ये पाठवले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच रुग्ण कोरोनाबाधित आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.