coronavirus: कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ, या राज्यात पुन्हा होणार कडक लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:19 PM2020-06-26T16:19:24+5:302020-06-26T16:20:56+5:30
अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.
गुवाहाटी - सुमारे सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यापासून काही राज्यांमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लगाम घालण्यासाठी काही राज्ये आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ लागली आहेत.
पूर्वोत्तर भारतातीलआसाममध्येही २८ जूनपासून पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गुवाहाटीमध्ये २८ जूनच्या मध्यरात्रीपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. तर आसामच्या इतर भागाताही आठवडाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील, असे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितले.
लॉकडाऊनबाबत माहिती देताना हेमंत बिस्व शर्मा म्हणाले की, शुक्रवारपासून आसाममध्ये रात्रीच्या वेळी १२ तासांची संचारबंदी लागू करण्यात येईल. त्यानंतर शनिवारपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू केले जाईल. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल. लॉकडाऊन दरम्यान काही परिसरांमध्ये लोकांच्या वर्दळीवर निर्बंध घालण्यात येतील. तसेच सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहील. तसेच खासगी वाहनांनाही परवानगी दिली जाणार नाही. सर्व मंदिरेसुद्धा बंद राहतील. तसेच केवळ अत्यावश्यक सेवानांचा परवानगी दिली जाईल.
आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. आजही राज्यात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ६ हजार ६४६ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी चार हजार ३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६०१ आहे.
दरम्यान, देशभरातही कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे तब्बल १७ हजार २९६ नवे रुग्ण सापडले आहे. तर देशभरात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ९० हजार ४०१ झाली आहे. तर आतापर्यंत देशात १५ हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मात्र या सर्वामध्ये दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १ लाख ८९ हजार ४६३ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.