Coronavirus : कोरोनाविषयी चुकीच्या जाहिरातींवर बंदी येणार, लवकरच नवीन नियमावली जारी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 05:32 AM2020-03-19T05:32:02+5:302020-03-19T05:32:17+5:30
नव्या नियमांत वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरात करताना कोरोना विषाणू, कोविद-१९ आणि त्यासंबंधित शब्द वापरण्यास तसेच चुकीचे दावे करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांसाठी जाहिराती, स्वच्छता आणि विक्री इत्यादींशी संबंधित नवे नियम केले जात असून, ग्राहक व्यवहार मंत्रालय त्यासाठी विविध हितधारकांशी बोलत आहे. नव्या नियमांत वस्तूच्या विक्रीसाठी जाहिरात करताना कोरोना विषाणू, कोविद-१९ आणि त्यासंबंधित शब्द वापरण्यास तसेच चुकीचे दावे करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. विक्री साखळीतील वस्तू उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि आयातदार अशा सर्वांनाच नवे नियम बंधनकारक असतील.
याशिवाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठीही काही नवे नियम केले जात आहेत. त्यानुसार या कंपन्यांना डिलिव्हरी कर्मचारी, किचन, पॅकिंग एरिया आणि डिलिव्हरी वाहने यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी लागणार आहे. सर्दी आणि फ्लूची लक्षणे असलेल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना कामावरून दूर करावे लागेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी होऊ नये यासाठीही विशेष नियम केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे किती नग एका ग्राहकाला द्यावेत, याचे नियम संघटित किरकोळ विक्री शृंखलांसाठी करण्यात येणार आहेत.
अधिकाºयाने सांगितले की, कोरोना विषाणूबाबत जागृती करणाºया अलीकडील लाईफबॉयच्या मुद्रित जाहिरातींसारख्या जाहिराती मात्र रोखल्या जाणार नाहीत. या जाहिरातीत कोणतेही खोटे दावे करण्यात आलेले नाहीत. याउलट काही उत्पादकांनी कोरोनासंदर्भात खोटे दावे करणाºया असंख्य जाहिराती केल्याचे आढळून आले आहे. मुद्रित माध्यमे, टीव्ही आणि वेबसाईटस्वरून या जाहिराती केल्या जात आहेत.
वस्तुंसाठीही नियम
आपले उत्पादन कोरोना विषाणूचा नि:पात करते असे दावे या जाहिरातींत करण्यात आले आहेत, अशा जाहिराती बंद करण्यासाठी नवे नियम केले जात आहेत. मास्कचे उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यासाठीही काही नियम केले जाणार आहेत.