Coronavirus: कुटुंबीयांनी नाकारले, समाजाने ठोकरले, अखेर पतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी महिलेने घेतला धक्कादायक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 04:49 PM2021-05-19T16:49:57+5:302021-05-19T16:57:08+5:30
Coronavirus News: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचा अवलंब केला जात आहे. मात्र कोरोनाच्या भयामुळे नाती, आपलेपणाही कमी होत चालला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पाटणा - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचा अवलंब केला जात आहे. मात्र कोरोनाच्या भयामुळे नाती, आपलेपणाही कमी होत चालला आहे. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील मुंगेर येथे घडली आहे. मृत पतीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक, समाज यांच्यापैकी कुणीच पुढे न आल्याने या महिलेने क्वारेंटाइन सेंटरमधून पळून जात पतीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. ( Family & community rejects, woman finally escapes from quarantine center and Funeral on husband)
रामनगर पाटन गावातील राहणाऱ्या २८ वर्षीय विकास मंडल यांचा आठवडाभरापूर्वी मृत्यू झाला होता. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर १३ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा त्यांच्या पत्नी कांचन देवी यांनी त्यांना बेगुसरायमधील रुग्णालयात दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असतानाच विकास मंडल यांचा मृत्यू झाला होता.
त्यावेळी कांचन देवी ह्या रुग्णालयात एकट्याच होत्या. त्यांनी विकास मंडल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सासरच्या लोकांकडे मदत मागितली. मात्र मदतीसाठी कुणीही पुढे आले नाहीत. मात्र कांचनची आई मदतीसाठी धावून आली. त्या दोघींनीही मुंगेरला जाण्याचा निर्णय घेतला. तसेच १४ मे रोजी पुन्हा एकदा पतीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मात्र त्यांनी पुन्हा एकदा येण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारले मात्र त्यांनीही नकार दिला. मग त्यांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र कुटुंबातील पुरुष मंडळींनी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. समस्तीपूर येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही महिलांच्या समस्येकडे लक्ष न देता त्यांची रवानगी क्वारेंटाइन सेंटरमध्ये केली.
कांचन आणि तिच्या आईने क्वारेंटाइन सेंटरच्या अधिकाऱ्यांकडे त्यांना सोडण्याची विनंती केली. अखेर पतीच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी कांचन आणि तिची आई क्वारेंटाइन सेंटरमधून पलायन करण्यात यशस्वी ठरल्या. १८ मे रोजी त्या बेगुसराय येथे पोहोचल्या. बेगुसरायचे एसडीओ संजीव कुमार चौधरी यांनी सांगितले की, पीडित महिलेने रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांकडे तिच्या पतीचा मृतदेह देण्याची विनंती केली. त्यानंतर आम्ही त्वरित पुढाकार घेऊन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सुपुर्द केला. आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यामधून मृतदेह सिमरिया घाटवरील स्मशानात नेण्यात आला. तिथे कांचनने पतीवर अंत्यसंस्कार केले.