Coronavirus : ‘तो’ दिल्लीहून घरी येताच, सख्खे नातलग घर सोडून झाले फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 10:48 AM2020-04-01T10:48:45+5:302020-04-01T10:57:39+5:30
युवक गावात आल्याची माहिती सरपंच कल्लू खां यांनी एसओ, एसडीओ आणि स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना दिली आहे. मात्र अद्याप युवकाला घेऊन जाण्यास कोणीही आलं नसल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. रेल्वेसह सर्व वाहतूक सेवा ठप्प करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या गावी जाणे अशक्य झाले आहे. तरी अनेक मजूर पायी चालत घर गाठत आहेत. मात्र या मजुरांना घरी पोहोचल्यावर देखईल अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.
अलीगढ येथील दादों येथील युवक काही महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात दिल्लीला गेला होता. मात्र लॉकडाउन केल्यामुळे दिल्लीत देखील सर्वकाही ठप्प झाले आहे. त्यामुळे युवक दिल्लीहून आपल्या गावी परतला. मात्र त्याला पाहताच त्याचे सख्खे नातलग घर सोडून फरार झाले.
दादों गावातील कांती प्रसाद यांचा मुलगा रिंकु दिल्लीत मजुराचे काम करत होता. लॉकडाउमुळे तो तीन दिवसांपूर्वी गावात परत आला. त्याला परतला हे कळताच त्याच्या कुटुंबातील लोक घराला कुलूप लावून फरार झाले. रिंकु आपल्या घराचे कुलूप तोडून घरात दाखल झाला. मात्र त्यांचे सख्खे नातलग अद्याप फरार आहेत. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार युवकाला सर्दी आणि ताप आहे. दरम्यान युवक गावात आल्याची माहिती सरपंच कल्लू खां यांनी एसओ, एसडीओ आणि स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना दिली आहे. मात्र अद्याप युवकाला घेऊन जाण्यास कोणीही आलं नसल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी मुंबईहून अखेरच्या रेल्वेने घरी पोहोचलेल्या युवकाला देखील त्याच्या माता-पित्याने दारात रोखून परत पाठवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आधी आरोग्य् विभागात जावून कोरोना झाला का याची तपासणी करून येण्यास सांगितले. मुलाने आपल्याला कोरोना झाला नसल्याचे अनेकदा सांगितले. मात्र त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. अखेर त्याने रुग्णालयात जावून तपासणी केली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.