Coronavirus: देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रायलाने तातडीची बैठक बोलावली, दिले असे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:23 PM2022-03-16T20:23:16+5:302022-03-16T20:24:04+5:30
Coronavirus Updates: कोरोनाचा वाढता धोका आणि देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र दिसत होते. मात्र आता पु्न्हा एकदा देशात कोरोनामुळे चिंता वाढताना दिसत आहे. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. दरम्यान कोरोनाचा वाढता धोका आणि देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.
आरोग्य मंत्रालयाने चीनमध्ये वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक सुमारे दीड तास चालली. यामध्ये कोरोनाबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी जिनोम सीक्वेंसिंगवर भर देण्यात आला. तसेच कोरोनाच्या चाचणीकडे गांभीर्याने पाहण्याचे आदेश दिले गेले. संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, अधिकाधिक कोरोना चाचण्या कशा होतील, हे निश्चित करा.
दरम्यान, चीनमध्ये गेल्या २४ तासंमध्ये कोरोना विषाणूचे पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे बहुतांश रुग्ण हे ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या 'stealth' चे आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चीनने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावले आहे. लॉकडाऊनचा परिणाम चीनमधील सुमारे ३ कोटी लोकांवर झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत दिले आहेत.