coronavirus : भारतातील कोरोनाविरोधातील लढाई जनताकेंद्रित, प्रत्येकजण करतोय नेतृत्व - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 11:41 AM2020-04-26T11:41:43+5:302020-04-26T12:01:47+5:30
संपूर्ण देशात गल्लीबोळात लोक एकमेकांना मदत करत आहेत. जनातेसोबत शासन-प्रशासनही लढत आहे
नवी दिल्ली - देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात च्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित केले. भारतातील कोरोनाविरोधातील लढाई ही जनताकेंद्री आहे. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. संपूर्ण देशात गल्लीबोळात लोक एकमेकांना मदत करत आहेत. जनतेसोबत शासन-प्रशासनही लढत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, भारतातील कोरोनाविरोधातील लढाई ही खऱ्या अर्थाने जनता केंद्री आहे. भारतात कोरोनाविरोधातील लढाई जनता लढत आहेत. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. तुम्ही लढत आहात. जनातेसोबत शासन आणि प्रशासन लढत आहे. देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाविरोधातील या लढाईचा शिपाई आहे. तसेच या लढाईचे नेतृत्व करत आहे.
कोरोनाविरोधात देशवासीयांनी संकल्पशक्ती दाखवली आहे. विमान आणि रेल्वेचे कर्मचारी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. घरात काम करणारे कामगार, दुकानातील सामान्य कामगार, सफाई कर्मचारी, डॉक्टर, पोलीस यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली आहे, असे मोदींनी सांगितले.
कोरोनविरोधात सुरू असलेल्या लढ्यादरम्यान बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोना आपल्या घरात, गल्लीत, ऑफिसात आलेला नाही म्हणजे, तो येणारच नाही असे नाही. 'सावधानी हटी, दुर्घटना घटी', असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घ्या, असे आवाहन मोदींनी केले.