Coronavirus: रामदेवबाबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, आयएमएचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:54 AM2021-05-23T05:54:23+5:302021-05-23T05:55:30+5:30
Coronavirus News: कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे. कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, ॲलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावरून संताप व्यक्त केला आहे. तसेच, बाबा रामदेव यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये, बाबा रामदेव यांनी केलेला दाव स्वीकारून आधुनिक उपचारपद्धती बंद करावी. अन्यथा बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आपत्ती व्यवस्थापन महामारी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करावा, असेही मेडिकल असोसिएशन संघटनेने आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उद्देशून म्हटले आहे.
रामदेवबाबांना कायदेशीर नोटीस
इंडियन मेडिकल असोसिएशनने रामदेवबाबा यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आरोप, वक्तव्ये सिद्ध करा किंवा माफी मागा अन्यथा ॲलोपॅथीची बदनामी केल्याबद्दल कोर्टात जाऊ असा इशारा दिला आहे.