coronavirus : सर्वपक्षीय नेत्यांनी कोरोनाच्या मोफत चाचणीसह पंतप्रधानाकडे केल्या या पाच मागण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 01:45 PM2020-04-08T13:45:25+5:302020-04-08T14:30:08+5:30
कोरोनाचा वाढत संसर्ग आणि लॉकडाऊनवरील पुढील कार्यवाहीबाबत चर्चा कारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या फ्लोअर नेत्यांसोबत बैठक बोलावली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या फैलावाला रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा वाढत संसर्ग आणि लॉकडाऊनवरील पुढील कार्यवाहीबाबत चर्चा कारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या फ्लोअर नेत्यांसोबत बैठक बोलावली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोरोनाच्या मोफत चाचणीसह पाच मागण्या केल्या आहेत.
सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींकडे केलेल्या मागण्यांमध्ये राज्यांच्या एफआरबीएमची राजकोषीय वित्तीय मर्यादा 3 ते 5 टक्के करावी, राज्यांचा थकीत निधी द्यावा, कॊरोनाबाबतच्या मदत पॅकेजची मर्यादा 1 टक्क्यावरून 5 टक्के करावी. कोरोनाची चाचणी मोफत करावी आणि पीपीईसह सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध करावीत.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद आणि अधीररंजन चौधरी, टीआरएसकडून नम्मा नागेश्वर राव आणि के. केशवा राव, सीपीआयएमकडून ई. करीम, टीएमसीकडून सुदीप बंडोपाध्याय, शिवसेनेकडून विनायक राऊत आणि संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि डीएमकेकडून टी. आर. बालू आणि एआयएडीएमकेकडून नवनीत कृष्णन हे सहभागी झाले होते. या प्रमुख नेत्यांसह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.