coronavirus : कोरोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात आले कर्नाटक मधील चार मंत्री, स्वतःला करून घेतले क्वारेंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:23 AM2020-04-30T11:23:17+5:302020-04-30T11:24:47+5:30
बंगळुरू - कोरोना विषाणूचा फैलाव सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरत असलेल्या व्यक्तींना या विषाणूचा असलेला धोका मोठ्या प्रमाणावर ...
बंगळुरू - कोरोना विषाणूचा फैलाव सातत्याने वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरत असलेल्या व्यक्तींना या विषाणूचा असलेला धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दरम्यान, कोरोना पाॉझिटिव्ह चार मंत्र्यांना क्वारेंटाईन व्हावे लागले आहे. हा प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. क्वारेंटाईन व्हावे लागलेल्या मंत्र्यांमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वत नारायण यांचाही समावेश आहे.
कर्नाटकमधील एका व्हिडीओ जर्नलिस्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या पत्रकाराच्या संपर्कात आलेल्या चार मंत्र्यांनी स्वतःला क्वारेंटाईन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपण कोरोना चाचणी करवून घेतली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती या मंत्र्यांनी दिली आहे.क्वारेंटाईन झालेल्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अश्वत नारायण यांच्यासोबत गृहमंत्री बसवराज बोम्मई, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर सुधाकर आणि पर्यटनमंत्री सी.टी. रवी यांचा समावेश आहे.
या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व मंत्री कर्नाटकमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या व्हिडीओ जर्नलिस्टच्या संपर्कात आले होते. हा पत्रकार त्यांना 21 ते 24 एप्रिलच्या दरम्यान त्यांना भेटला होता. दरम्यान, या पत्रकाराच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबीय आणि इतर पत्रकारांसह सुमारे 40 जणांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे.
कर्नाटकमध्ये आतापर्यंत सुमारे 532 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पैकी 215 रुग्ण बरे झाले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाचा जास्त प्रभाव नसलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊनमधून सूट देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. चमराजनगर, कोप्पल, चिकमंगळूर, रायचूर, हसन, चित्रदुर्ग, यादगीर, हवेरी, कोलार, कोडागू, उडूपी आणि दावणगिरी या जिल्ह्यात लॉकडाऊनमधून सवलत देण्यात येईल.