coronavirus: दिल्लीत कोरोनाची चौथी लाट; तूर्तास लॉकडाऊन नाही, केजरीवाल यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 06:32 AM2021-04-03T06:32:32+5:302021-04-03T06:33:07+5:30
coronavirus:कोविड-१९ साथीच्या चौथ्या लाटेशी दिल्ली मुकाबला करीत आहे; परंतु दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत अद्याप विचार करण्यात आलेला नाही.
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या चौथ्या लाटेशी दिल्ली मुकाबला करीत आहे; परंतु दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबत अद्याप विचार करण्यात आलेला नाही.
लॉकडाऊन करण्याची गरज पडल्यास जनतेचे म्हणणे जाणून घेतले जाईल. तसेच सल्लामसलत करूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यासाठी राज्यांना परवानगी द्यावी, अशी सूचनाही त्यांनी शुक्रवारी केंद्राला केली.
दिल्लीतील कोरोनाची चौथी लाट आधीच्या तुलनेत कमी गंभीर स्वरूपाची आहे. कारण यावेळी मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असून रुग्णांना इस्पितळात दाखल करण्याचीही गरज भासत नाही.
कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे; परंतु घाबरण्याची गरज नाही. सरकार स्थितीवर लक्ष ठेवून असून सर्व आवश्यक पावले उचलण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले.
लसीकरणासाठी ४५ वर्षे वयाची अट केंद्राने रद्द करून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा मार्ग खुला करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. शाळांसारख्या आरोग्यतेर केंद्रावर लसीकरणास मुभा दिल्यास कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण करता येईल.