Coronavirus: भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल, आठवडाभरात तब्बल ३५ टक्के रुग्णवाढ झाल्याने चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:23 AM2022-04-18T10:23:49+5:302022-04-18T10:26:41+5:30
Coronavirus: गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णसंख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
नवी दिल्ली - गेल्या एक दोन महिन्यांपासून ओसरलेला कोरोना विषाणू भारतात पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णसंख्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा कमी आहे.
भारतात कोरोना रुग्णसंख्येची वाढ ही दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात दिसून आली आहे. गेल्या सात दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र देशातील उर्वरित भागात कोरोना नियंत्रणात आहे. मात्र या वाढत्या आकड्यांनी लोकांची चिंता वाढवली आहे.
भारतामध्ये रविवारी संपलेल्या आठवड्यामध्ये कोरोनाचे सुमारे ६ हजार ६१० रुग्ण सापडले. गेल्या आठवड्यातील चार हजार ९०० रुग्णांच्या तुलनेत आकडा अधिक आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात सुमारे ७ हजार १० रुग्ण सापडले होते. मात्र यावेळच्या आकड्यांमध्ये केरळमधील रुग्णसंख्येचा समावेश नाही आहे. कारण केरळने या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येची आकडेवारी देणे बंद केले आहे. केरळमध्ये ४ ते १० एप्रिलदरम्यान कोरोनाचे दोन हजार १८५ रुग्ण सापडले होते.
दरम्यान, कोविड नेटवर्क प्रिवलेंस गेल्या १५ दिवसांमध्ये ५०० पटींनी वाढले आहे. म्हणजेच दिल्ली-एनसीआरमध्ये आपल्या जवळच्या सोशल नेटवर्कमध्ये कुणालाही कोरोना झाल्याची माहिती देणाऱ्या लोकांच्या संख्येत लोकांच्या संख्येत गेल्या १५ दिवसांत ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने सांगितले की, सर्व्हेमध्ये दिल्ली एनसीआरमधील सर्व जिल्ह्यांतील ११ हजार ७४३ जणांकडून माहिती घेण्यात आली.
दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाच्या ५१७ रुग्णांची नोंद झाली. तसेच दिल्लीमध्ये आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही १५१८ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार यादरम्यान २६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत कोरोनामुले कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.