Coronavirus : तामिळनाडूमध्ये मोफत धान्य आणि एक हजार रुपये साह्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:39 AM2020-03-25T01:39:25+5:302020-03-25T01:39:53+5:30
coronavirus : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या शक्यतेने बांधकाम व्यवसाय बंद पडला असून, रिक्षाचालकांचा धंदाही पार बंद झाला आहे.
चेन्नई : कोरोनामुळे सारे व्यवहार ठप्प झालेले असताना आणि रोजंदारीवरील मजुरांची जेवणाचीही आबाळ होत असताना तामिळनाडू सरकारने राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांना मोफत धान्य आणि एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सरकारने ३२८० कोटी रुपयांचे विशेष पॅकेजच जाहीर केले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी मंगळवारी ही घोषणा करताना सांगितले की, सर्व रेशनकार्डधारकांना एप्रिल महिन्यात तांदूळ, साखर, डाळ, तेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू शिधावाटप दुकानांत मोफत दिल्या जातील. याशिवाय प्रत्येक कार्डधारकाला एक हजार रुपयेही देण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या शक्यतेने बांधकाम व्यवसाय बंद पडला असून, रिक्षाचालकांचा धंदाही पार बंद झाला आहे. त्यामुळे सर्व बांधकाम मजूर आणि रिक्षाचालक यांना एक हजार रुपये मदत, १५ किलो तांदूळ तसेच एक किलो डाळ व तेल देण्यात येईल. याशिवाय मनरेगामध्ये काम करणाऱ्या सर्व मजुरांना या महिन्यात दोन दिवसांचा जादा पगार दिला जाईल. राज्यातील अम्मा कँटीनची व्याप्तीही सरकारने वाढविली आहे. (वृत्तसंस्था)