Coronavirus: मृत्यूच्या ७५ दिवसानंतर कोविड संक्रमित रुग्णावर अंत्यसंस्कार; विलंबाचं कारण ऐकून धक्का बसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 12:02 PM2021-07-04T12:02:13+5:302021-07-04T12:03:53+5:30
मेरठमध्ये एका कोविड संक्रमित रुग्णांचा मृतदेह तब्बल ७५ दिवस हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आला होता.
मेरठ – कोरोनामुळं संपूर्ण जगावर संकट उभं राहिलं आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले. कोरोना काळात काहींनी माणुसकी जपत केलेल्या कार्यामुळे सगळ्यांसमोर आदर्श घालून दिला. तर काही ठिकाणी माणुसकीला लाजवणाऱ्याही घटना घडल्या. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
मेरठमध्ये एका कोविड संक्रमित रुग्णांचा मृतदेह तब्बल ७५ दिवस हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आला होता. लाला लाजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील हा प्रकार आहे. याठिकाणी नरेश नावाच्या कोरोना पीडिताचं १५ एप्रिल रोजी निधन झालं. नरेशची पत्नी गुडीया आणि कुटुंबीय त्याचा मृतदेह आणण्यासाठी बस्तीहून हॉस्पिटलला आले होते. परंतु १५ हजार न दिल्याने मृतदेह देण्यास हॉस्पिटलने नकार दिला. जवळपास अडीच महिने हा मृतदेह हॉस्पिटलने त्यांच्या शवगृहात ताब्यात ठेवला होता. या प्रकाराने लोकांमध्ये संताप निर्माण झाला.
नरेशच्या पत्नीने सांगितले की, डॉक्टरांनी नरेशचा मृतदेह घेण्यापूर्वी १५ हजार रुपये मागितले होते. परंतु माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावर डॉक्टर म्हणाले आम्हीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करतो. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने नरेशच्या पत्नीचा आरोप फेटाळून लावला आहे. रुग्णासोबत त्याचा भाऊ विजय होता. जेव्हा १५ एप्रिलला रुग्ण नरेशचा मृत्यू झाला. तेव्हा विजयच्या नंबरवर कॉल केला तेव्हा तो नंबर बंद येत होता. पैशांची मागणी केली हा आरोप खोटा आहे. आमच्याकडे पर्यायी जागा उपलब्ध नव्हती. जेव्हा मृतदेह घेऊन जाण्यासाठी कोणी आलं नाही तेव्हा आम्ही मृतदेह हापुडला पाठवला असं हॉस्पिटल प्रशासनाचे डॉ. विदित दिक्षित यांनी सांगितले.
या प्रकरणात मेरठचे जिल्हाधिकारी के. बालाजी म्हणाले की, या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यासाठी आम्ही तपास पथक बनवलं आहे. हापुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश खत्री यांच्या माहितीनुसार, खूप दिवसांपासून आम्ही मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणीही या मृतदेहावर दावा केला नव्हता. जीएस कॉलेजच्या मोर्चरी विभागात मृतदेह ठेवण्यात आला. त्यानंतर आम्ही मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. यात पोलिसांची मदत मागितली. जो नंबर दिला होता तो ट्रेस केला. त्यानंतर पोलिसांना गुडीयाचा पत्ता सापडला. तिला हापुडला बोलवण्यात आलं. २ दिवसांपूर्वीच तिच्या उपस्थितीत नरेशचं अंत्यसंस्कार करण्यात आलं. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.