Coronavirus: “घरी जा अन्यथा, मेला तर गॅरेंटी नाही”; हॉस्पिटल न सोडणाऱ्या रुग्णांना मंत्र्यांचा धक्कादायक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 11:39 AM2021-04-17T11:39:16+5:302021-04-17T11:40:55+5:30
इतकचं नाही तर मंत्र्यांनी डॉक्टरांना सांगितले की, रुग्णांना सेवा देणं बंद करा. गोपाल भार्गव यांचा डॉक्टरांसोबत संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एकीकडे देशभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यात राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधानांची मालिकाही सुरूच आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा हॉस्पिटलमध्ये जनकल्याण मंत्री गोपाल भार्गव पोहचले. तेव्हा डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसंबंधित समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावर मंत्रीमहोदयांनी अजब उपाय सांगितले.
नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्ण घरी जाऊ इच्छित नाहीत. रुग्ण जास्त असल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यानंतर मंत्री गोपाल भार्गव यांनी काही अजब उपाययोजना सांगितल्या. रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेला तर आमची जबाबदारी नाही असं मंत्री म्हणाले.
इतकचं नाही तर मंत्र्यांनी डॉक्टरांना सांगितले की, रुग्णांना सेवा देणं बंद करा. गोपाल भार्गव यांचा डॉक्टरांसोबत संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावेळी स्थानिक नेतेही तिथे उपस्थित होते. या समस्येवर संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, सर्व जिल्ह्यातील रुग्ण इथे आहेत. कोणालाही अडवू शकत नाही कारण हे सरकारी रुग्णालय आहे. जे रुग्ण कोरोनातून बरे झाले ते घरी जात नाहीत. ज्यांची ऑक्सिजन पातळी ९६-९८ आहे तेदेखील इथेच राहत आहेत. शुक्रवारी २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं. त्यातील फक्त १ रुग्ण घरी गेला. जर बरे झालेले रुग्ण हॉस्पिटलमध्येच राहत असतील तर गंभीर रुग्णांना कुठे ठेवायचं? घरात ऑक्सिजन पातळी कमी होईल या भीतीनं रुग्ण घरी जायला तयार नाहीत असं डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनासारख्या महामारीनं लोकांच्या मनात दहशत आहे. अशात नेत्यांच्या अशा विधानामुळे रुग्णांची मानसिकता अजूनही खालावत आहे. मध्य प्रदेशात २ दिवसांपूर्वी एक प्रकरण समोर आलं होतं. जिथे शिवपूर जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. रुग्णाला लावलेला ऑक्सिजन सपोर्ट यूनिट स्टाफनं काढल्याचं सीसीटीव्ही कैद झालं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.