CoronaVirus: “एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते, रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहात होते”: जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:47 PM2021-05-23T16:47:23+5:302021-05-23T16:49:35+5:30
CoronaVirus: स्थानिक पातळीवरील परिस्थिती सांगताना एका जिल्हाधिकाऱ्याला अश्रु अनावर झाले.
गोरखपूर: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत घसरण पाहायला मिळत असली, तरी वाढत्या मृत्युंमुळे चिंतेत भर पडत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतर आता देशभरातील प्रशासन यासाठी तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्राकडून राज्य सरकारला विविध सूचना केल्या जात आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील परिस्थिती सांगताना एका जिल्हाधिकाऱ्याला अश्रु अनावर झाले. या जिल्हाधिकाऱ्यांची एक ऑडिओ सध्या व्हायरल होत असून, काही गोष्टी त्यांनी उघडपणे मान्य केल्याचे बोलले जात आहे. (coronavirus gorakhpur dm admitted wait for a single bed by 100 patients audio viral)
गोरखपूरचे जिल्हाधिकारी के. विजयेंद्र पाण्डियन यांचा एक ऑडिओ व्हायरल होत असून, एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काही गोष्टींची जाहीररित्या कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट फारच भयावह होती. एकवेळ अशी आली होती की, एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते आणि रुग्णांच्या मृत्यूची वाट पाहत होते, असे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाल्याचे सांगितले जात आहे.
“आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?”; भाजपचा सवाल
लॉकडाऊन उठवणे हा नाइलाज
कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली असताना लावण्यात आलेला लॉकडाऊन हा केवळ १० दिवसांत उठवावा लागला. हा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात आला. अर्थव्यवस्थाही सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा नगरसेवकांनी उत्तम काम केले. कोरोना आला आणि गेला. मात्र, कोरोनाचे प्रकार घातक असून, त्याचा संसर्ग वेगाने होत असल्याचे जिल्हाधिकारी पाण्डियन यांनी सांगितले.
बेड्सचे नियोजन करताना धावपळ
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली आणि बेड्सचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. कोणाला बेड द्यावा, याबाबत धावपळ झाली. एका दिवशी एका बेडसाठी १०० जण वेटिंगवर होते. रुग्णांच्या मृत्युची वाट पाहात होते. कारण रुग्णांचा मृत्यू झाला, तरच बेड्स रिक्त होत होते. अशी कठीण स्थिती कुणालाही पुन्हा आयुष्यात पाहायला लागू नये, असे सांगताना जिल्हाधिकाऱ्यांना अश्रु अनावर झाले.
संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ४० हजार ८४२ नवीन कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५५ हजार १०२ रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात सध्या २८ लाख ५ हजार ३९९ रुग्ण हे उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी गेला आहे.