coronavirus: देशात कोरोनाचा आलेख सपाट होतोय? आकडेवारीतून आशेचा किरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:02 AM2020-05-15T06:02:17+5:302020-05-15T06:04:11+5:30
आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारतात लागू करण्यात आलेल्या लॉकाडाऊनला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्य अधिकृत सूत्रांच्या विश्लेषक माहितीनुसार भारतातील कोरोनाचा आलेख सपाट होत असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, तर मृत्यू दर आणि रुग्णाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अवधीही कमालीचा वाढल्याने या आकडेवारीने आशा पल्लवित झाल्या आहेत.
उपरोक्त अधिकृत सूत्रांच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर गुरुवारी ३३.६ टक्क्यांवर गेला असून, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. एवढेच नाही तर, कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही ३.३ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावधीतही गेल्या तीन दिवसांत लक्षणीय वाढ (१२.२) झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दरही ५.५ टक्क्यांवर घसरला आहे.
भारतात आजघडीला प्रति दहा लाख लोकसंख्येमागे १,२१२ चाचण्या केल्या जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचा दर मात्र गेल्या ५० दिवसांत स्थिर आहे. १ एप्रिल रोजी प्रति दहा लाख लोकांमागे ४० चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता चाचणीचे प्रमाण ३० पटींनी वाढले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा दर १ एप्रिल रोजी ३.७ टक्के होता, तो ११ मे रोजी ४ टक्के आहे. आणखी एक धीर देणारी बाब म्हणजे संसर्ग गुणांक दरही १.२३ टक्क्यांवर आला आहे. कोणतीही लस नसताना मिळालेले हे मोठे यश होय. वास्तविकता हा दर १ टक्क्याच्या खाली आला पाहिजे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्रात चाचण्या अधिक
रुग्ण आणि मृत्यूसंख्येनुसार भारतात या आठवड्यातील सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्टÑ असले तरी टक्केवारीच्या तुलनेत पाच दिवसांतील सर्वाधिक दर ओडिशा (१५ टक्के), बिहार (१०६ टक्के), तामिळनाडूत (९%) आहे.
तामिळनाडूनंतर महाराष्टÑात मोठ्या संख्येने चाचण्या (२.१८ लाख) केल्या जात असल्याने रुग्ण वाढत आहेत. चाचण्या करण्यात बिहार आणि ओडिशा मात्र सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.