Coronavirus: काँग्रेस आमदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री होणार होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 11:12 PM2020-04-14T23:12:42+5:302020-04-14T23:18:23+5:30
मात्र कॉंग्रेसचे आमदार मास्क न घालता मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते आणि त्यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती.
अहमदाबाद – देशात कोरोना कहर वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा ६५० पर्यंत पोहचला आहे तर २८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी कोरोनाचे ७८ रुग्ण आढळले आहेत. पण यात धक्कादायक म्हणजे एका काँग्रेस आमदारालाही कोरोना लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.
अहमदाबादमधील जमालपूर-खाडियाचे कॉंग्रेसचे आमदार इमरान खेडावाला हे मंगळवारी मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि गृहमंत्री यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. या बातमीनं राज्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत आणखी बरेच मंत्रीही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह हे सर्व मंत्री स्वत: ला विलग ठेवण्याची शक्यता आहे.
मात्र कॉंग्रेसचे आमदार मास्क न घालता मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते आणि त्यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत त्यांनी स्वत: विलग ठेवणे आवश्यक आहे. परंतु, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे.
बुधवारी पहाटे सहापासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री रुपाणी यांनी शहरातील जुन्या भागात,फोर्ट आणि दानिलिमदा येथे कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. २१ एप्रिलपर्यंत याठिकाणी कर्फ्यू सुरू राहणार आहे. कॉंग्रेसचे आमदार खेडावाला यांचा विधानसभा मतदारसंघही याच भागात येतो. यावेळी लोकांना जीवनावश्य वस्तू कशा पोहचवता येतील यासाठी खेडावाला यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत दानिलिमदा येथील कॉंग्रेसचे आमदार शैलेश परमार आणि दर्यापूरचे आमदार गयासुद्दीन शेख हेदेखील उपस्थित होते. ही बैठक सुमारे १५ मिनिटे चालली होती.
यावेळी, सर्व आमदारांनी आपापल्या भागात कर्फ्यू दरम्यान आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीत कॉंग्रेसचे आमदार खेडावाला यांनी मास्कदेखील घातला नव्हता. यानंतर या तिन्ही आमदारांनी पत्रकार परिषदही घेतली, ज्यात पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेव्हापासून खेडावाला यांच्या क्षेत्रात कोरोना संसर्गाची प्रकरणे येऊ लागली आहेत. तेव्हापासून कॉंग्रेसचे आमदार खेडावाला जमालपूर खडिया भागात लोकांमध्ये जाऊन त्यांना कोरोनापासून वाचण्यासाठी जनजागृत करत होते. या काळात संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तेसुद्धा कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सकाळी कोरोना चाचणीचे नमुना दिले होते. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.