CoronaVirus News : भय इथले संपत नाही! हरिद्वारच्या जिल्हा कारागृहात कोरोनाचा विस्फोट; 70 कैदी पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 11:36 AM2022-08-04T11:36:45+5:302022-08-04T11:53:46+5:30
CoronaVirus News : जेलमधील आणखी काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. कोरोना सँपलिंग इंचार्ज डॉक्टर राजेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहातील 70 कैद्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,893 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,530 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याचा दरम्यान एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. हरिद्वारच्या जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून तब्बल 70 कैदी पॉझिटिव्ह आले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण 300 हून अधिक कैद्यांचा रिपोर्ट येणं बाकी आहे.
जेलमधील आणखी काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. कोरोना सँपलिंग इंचार्ज डॉक्टर राजेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहातील 70 कैद्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जवळपास 937 कैद्यांचं आरटीपीसीआर सँपल घेण्यात आले. ज्यातील 500 कैद्यांचा रिपोर्ट आला आहे. यामध्ये 70 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 300 जणांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. ज्या कैद्यांचे नमुने घेण्यात आले त्याच्यात कोणतीही लक्षणं दिसली नव्हती. पण आदेशानुसार सँपलिंग करण्यात आलं होतं.
जेलमध्ये मोठ्या संख्येने कैदी पॉझिटिव्ह आढळल्याने जेल प्रशासनात खळबळ उडाली असून कोरोनाशी संबंधित महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येत आहे. या कैद्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना मास्क लावण्याचा सल्ला हा वारंवार दिला जात आहेत.