CoronaVirus: कोरोनाशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट; 'या' राज्याचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 09:10 AM2020-04-10T09:10:51+5:302020-04-10T09:13:13+5:30
Coronavirus वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोधौर्य वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
चंदिगढ: देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना समाजात चांगली वागणूक मिळत नसल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचं वेतन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हरयाणातल्या वैद्यकीय आणि या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्याना दुप्पट पगार मिळेल. पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांना दुप्पट वेतन मिळत राहील. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय विद्यापीठांचे कुलगुरू, मेदांता मेडीसिटीचे संचालक डॉ. नरेश त्रेहन, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेससोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करण्यात आल्याची माहिती दिली.
सध्या कर्तव्य बजावत असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. कित्येकदा डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे सरकारनं तत्काळ पॅकेज द्यावं, अशी विनंती एका महिला डॉक्टरनं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना मुख्यमंत्र्यांकडे केली. यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी आरोग्य मंत्री अनिल विज आणि विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून वैद्यकीय आणि या क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांचं वेतन दुप्पट करत असल्याची घोषणा केली. याचा लाभ कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्स, चतुर्थ श्रेणी कामगार, रुग्णवाहिका चालकांना मिळेल.
याआधी ओदिशा सरकारनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. स्वत:च्या प्राणांची बाजी लावून कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन आधीच देण्याचा निर्णय ओदिशा सरकारनं घेतला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा निर्णय जाहीर केला.