Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 08:47 AM2020-04-02T08:47:22+5:302020-04-02T08:55:37+5:30
Coronavirus : गुरुग्राममध्ये 10 करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी आता 9 जणांची प्रकृती ठिक असून ते बरे झाले आहेत.
गुरुग्राम - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील 24 तासांत 400 ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात 1900 रुग्ण आणि 58 बळी आहेत. मागील 24 तासांत 132 जण बरे झाले किंवा रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, यासाठी लोकांनी सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीत. गर्दी टाळावी असं आवाहन सातत्याने प्रशासाच्या वतीने लोकांना केलं जात आहे. याच दम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
देशात कोरोनाची संख्या वाढत असताना हरियाणाच्या गुरुग्राममध्ये दिलासादायक चित्र आहे. कोरोनाची लागण झालेल्या 10 रुग्णांपैकी 9 जण बरे झाले आहेत. या पैकी काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. घरी सोडण्यात आलेल्या व्यक्तींना डॉक्टरांनी काही दिवस विलग राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच बुधवारी ( 1 एप्रिल) हरियाणामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सुरुवातीला गुरुग्राममध्ये 10 करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी आता 9 जणांची प्रकृती ठिक असून ते बरे झाले आहेत.
हरियाणातील 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 13 जणांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलिगी जमात मरकजच्या कार्यक्रमात राज्यातील 503 जण सहभागी झाले आहेत. यातील 72 जण विदेशी आहेत. त्यांची माहिती मिळवण्यात येत आहे'. तसेच या सर्वांना क्वारंटाइन करण्याचे काम सुरू आहे, सर्व 503 जणांची वैद्यकीय केली जाणार आहे. जे पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांच्यावर रुग्णालयातील स्वतंत्र विभागात उपचार करण्यात येतील. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल असं देखील अनिल विज यांनी सांगितलं आहे.
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजर राहिलेल्यांनी प्रवास केल्यानंतर देशभरात 154 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यात जम्मू-काश्मीरचे 23, तेलंगणा 20, दिल्ली 18, तामिळनाडू 65, आंध्र प्रदेश 17, अंदमान निकोबार 9 व पुडुच्चेरीचे दोन आहेत. सर्व राज्यांना सतर्क करण्यात आले असून, त्यांना शोधण्याचे निर्देश देण्यात आले. लक्षणे दिसणाऱ्यांना आयसोलेशन करण्याचे किंवा रुग्णालयात पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीतील घटनेशी संबंधित 1800 जणांना 9 कॉरेंटाईन सेंटर्स व रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus : पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद
Coronavirus: कोरोना विषाणूचे भारतात २४ तासांत ४०० नवे रुग्ण; १३२ जण झाले बरे; एकूण ५८ जणांचा मृत्यू