coronavirus: ३६ वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या हेड नर्सचा कोरोनामुळे मृत्यू, सहकाऱ्यांनी साश्रू नयनांनी दिला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:37 PM2020-05-20T13:37:42+5:302020-05-20T13:47:16+5:30
डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी आणि पोलीस हो कोविड योद्धे प्राण संकटात टाकून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये अनेक कोविड योद्ध्यांना आपले बलिदान द्यावे लागत आहे.
अहमदाबाद - संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोना विषाणूमुळे होत असलेला संसर्ग दिवसेंदिवस अधिकच गंभीर रूप धारण करत आहे. भारतातही कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, डॉक्टर, नर्स, रुग्णालय कर्मचारी आणि पोलीस हो कोविड योद्धे प्राण संकटात टाकून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये अनेक कोविड योद्ध्यांना आपले बलिदान द्यावे लागत आहे. अशीच एक घटना गुजरातमधून समोर आली आहे. येथे तब्बल ३६ वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या हेड नर्सचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये कोविड योद्ध्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.
अहमदाबादमधील सिव्हिल कोविड रुग्णालयात रुग्णसेवा करणाऱ्या ५६ वर्षीय हेड नर्सचा मृत्यू झाला आहे. हायपरटेंशन, हृदयरोग आणि अतिवजन अशा व्याधी असूनही त्या रुग्णसेवा देत होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर उपचारांदरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांना निरोप देताना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.
कॅथरिनबेन अनुपमभाई ख्रिश्चन असे या हेड नर्सचे नाव असून, त्यांनी ३२ वर्षे अहमदाबाद आणि जामनगर येथे रुग्णसेवा केली होती. हल्लीच त्यांची सिव्हिल रुग्णालयातील गायनेक विभागातील जी ३ वॉर्डमध्ये हेडनर्स म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्याच देखरेखीखाली, कोविड हॉस्पिटलमध्ये ए-२ वॉर्ड तयार करण्यात आला होता, अशी माहिती सिव्हीलमधील नर्सिंग सुपरिटेंडेट बाबूभाई प्रजापती यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
रशियाने रोबोच्या मदतीने उडवले लढाऊ विमान, अमेरिकेसह इतर देशांवर केली कुरघोडी...
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, एकाच दिवसात सापडले साडे पाच हजार रुग्ण
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखांवर, पण देशवासियांसाठी ही आहे दिलासादायक खबर
दरम्यान, गुजरातमध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवलेली आहे. गुजरात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १२ हजार १४० रुग्ण सापडले आहेत. पैकी ७१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.