coronavirus: कोरोनाविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला पीएम केअर्समधून मदत द्या, संजय राऊत यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:53 AM2020-09-18T11:53:30+5:302020-09-18T12:01:28+5:30
राज्यसभेमध्ये कोरोनाचा साथीच्या नियंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत सहभागी झालेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर निधीमधून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये केली आहे. तसेच कोरोनाविरोधातील लढाईत कुणीही राजकारण आणू नये, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
गुरुवारी राज्यसभेमध्ये कोरोनाचा साथीच्या नियंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत सहभागी झालेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. तसेच महाराष्ट्राला पीएम केअरमधून निधी देण्यात यावा अशी मागणी केली. त्याबरोबरच केंद्र सरकारकडे थकीत असलेला राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारने लवकरात लवकर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल तसेच दिल्लीसारखी राज्ये कोरोनाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत नाहीत. तर भाजपाशासित राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, अशातला भाग नाही, सर्वच राज्ये या संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत एकमेकांकडे बोट दाखवणे योग्य ठरणार नाही, असे सांगत कोरोनाविरोधातील लढाईत राजकारण आणू नका असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
सप्टेंबर महिन्यापासून केंद्राने मदतीचा हात आख डता घेतला आहे. वैद्यकीय उपकरांचा पुरवठा केंद्र सरकारकडून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर सुमारे साडेतीनशे कोटींचा अधिक बोजा पडणार आहे, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. दरम्यान, या चर्चेवेळी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही कोरोनाच्या मुद्द्यावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले.
लॉकडाऊन, कोरोनावरून शिवसेनेचा केंद्रावर घणाघात
मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशासमोर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थाही अडखळली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात निर्माण झालेल्या मोठ्या आर्थिक संकटावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चला फक्त चार तासांच्या मुदतीवर कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्या दिवसापासून सुरू झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. त्या गोंधळाच्या गर्तेत देश गटंगळ्या खात आहे, कसे व्हायचे, असा टोला सामनामधून मोदी सरकारला लगावण्यात आला आहे.
सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात म्हटले आहे की, देशावर आर्थिक संकट कोसळले आहे आणि केंद्र सरकारने सरळसरळ हात झटकले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याराज्यात जे संकट निर्माण झाले आहे, ते मुख्यत्वेकरून कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहे. अशा परिस्थितीत केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात अशी मदत गुजरातला केली होती. केंद्राकडे स्वत:ची महसुली उत्पन्नाची साधने कमी आहेत. राज्यांनी दिलेल्या महसुलावर केंद्राचे दुकान चालते.