CoronaVirus : खासदारांकडून मदतीचा हात; आपापल्या मतदारसंघात आर्थिक आणि इतर स्वरूपात मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 02:50 AM2020-03-28T02:50:11+5:302020-03-28T05:39:14+5:30
Coronavirus : मोठ्या संख्येने संसद सदस्य आर्थिक मदत करताना दिसत आहेत. पीलीभितचे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिल्लीत अडकलेल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात संसद सदस्य मदतीसाठी पुढे येत आहेत. आपल्या मतदारसंघात खासदार अनेक प्रकारची मदत करताना दिसत आहेत.
मोठ्या संख्येने संसद सदस्य आर्थिक मदत करताना दिसत आहेत. पीलीभितचे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी दिल्लीत अडकलेल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशा २०० पेक्षा अधिक लोकांसाठी त्यांनी एक महिन्याचे धान्य आणि औषधींची व्यवस्था केली आहे. हे लोक रोजगार आदी कारणास्तव दिल्लीत अडकले आहेत. बागपतचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी आसाममधील सिलचरमध्ये अडकलेल्या बागपत आणि शामली भागातील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. अनेक खासदार आर्थिक मदत करत आहेत. सुलतानपूरच्या भाजपच्या खासदार मनेका गांधी यांनी पाळीव प्राण्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
निवासस्थानी लोकांसाठी भोजनाची व्यवस्था
केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी लोकांच्या मदतीसाठी व्हॉटस्अॅप नंबर जारी केला आहे. यावर मोठ्या संख्येने लोक मदत घेत आहेत. आग्रा येथील भाजपचे खासदार एस. पी. सिंह बघेल यांनी दिल्लीत अडकलेल्या लोकांसाठी आपल्या दिल्ली स्थित सरकारी निवासस्थानाचे दरवाजे खुले केले आहेत. सरकारी निवासस्थानी या लोकांच्या भोजनाची आदी व्यवस्था केली आहे.