CoronaVirus News: आता हर्ड इम्युनिटी देशाला कोरोनापासून वाचवणार?; आरोग्य मंत्रालय म्हणतं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:33 PM2020-07-30T19:33:04+5:302020-07-30T19:36:16+5:30
CoronaVirus News: मुंबई, दिल्लीतील अनेकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याचं सिरोचं सर्वेक्षण सांगतं
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १५ लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. दर दिवशी देशात कोरोनाचे जवळपास ५० हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आता हर्ड इम्युनिटीमुळे मुंबई आणि दिल्लीकरांच्या आशा वाढल्या आहेत. या दोन मोठ्या शहरांमधील अनेक नागरिकांना कोरोना होऊन गेला. त्यातून ते आपोआप बरे झाले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हर्ड इम्युनिटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भाष्य केलं.
दिल्ली, मुंबईत झालेल्या सीरो सर्व्हेमधून अतिशय दिलासादायक आकडेवारी समोर आली. मुंबईतल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या ५७ टक्के, तर इमारतींमध्ये राहणाऱ्या १६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं. तीन विभागांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली. त्यामुळे हर्ड इम्युनिटीच कोरोना संकटातून देशाला बाहेर काढेल, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आज आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सरकारच्या वतीनं भाष्य केलं.
Herd immunity in a country of the size & population of India can't be a strategic option. It can only be achieved through immunisation. Health Ministry thinks it's possible in future but for now we've to follow COVID appropriate behaviour: R Bhushan, Secretary, Ministry of Health pic.twitter.com/2u5G0FQvL0
— ANI (@ANI) July 30, 2020
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात हर्ड इम्युनिटी कोरोनाचा सामना करण्याची रणनीती असू शकत नाही, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं. देशात सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र ती आरोग्य मंत्रालयानं फेटाळून लावली आहे.