Coronavirus: देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’चाही संसर्गावर मात करण्यासाठी पर्याय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:51 PM2020-05-07T23:51:05+5:302020-05-08T07:11:29+5:30
‘हर्ड इम्युनिटी’मध्ये लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. हे एखादी लस देऊन ते केले जाते वा बाधित लोकांमध्ये यावर मात करण्याची प्रतिकारशक्ती आपसूक विकसित होईल,
नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारताप्रमाणे सारे जग अनेक प्रयत्न करून धडपडत आहे. परंतु, यावर एखादी लस किंवा औषध नेमके कधीपर्यंत शोधले जाईल, हे ठामपणे सांगता येत नाही. अशा स्थितीत भारतात नागरिकांना यापासून वाचवण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो.
‘हर्ड इम्युनिटी’मध्ये लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. हे एखादी लस देऊन ते केले जाते वा बाधित लोकांमध्ये यावर मात करण्याची प्रतिकारशक्ती आपसूक विकसित होईल, अशी स्थिती निर्माण केली जाते. भारतात अद्याप हर्ड इम्युनिटीचा प्रयोग सुरू झालेला नाही; परंतु वाढलेला संसर्ग पाहता या पर्यायाचा विचार होण्याची चिन्हे आहेत. देशात सध्या रेड, आरेंज आणि ग्रीन असे ती झोन पाडण्यात आले आहेत. ४३ टक्के जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. तेथे गेल्या २१ दिवसांमध्ये एकही बाधित आढळलेला नाही. इथे काही सेवा, उद्योग, दुकाने आदींना सुरू ठेवण्याची सवलत दिली आहे. लोक बाहेर पडत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांत लोकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण झाली आहे की नाही, याची चाचणी करता येऊ शकते. अशाच सवलती रेड झोनमध्ये दिल्या जातील, तेव्हा तिथेही ‘हर्ड इम्युनिटी’ची चाचणी खऱ्या अर्थाने सुरू होईल.