CoronaVirus: ...अन् 'त्या' अस्वस्थ मूर्तिकारानं मंदिरातच स्वत:ची जीभ कापून घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:26 AM2020-04-20T01:26:32+5:302020-04-20T07:22:15+5:30
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मंदिरात स्वत:ची जीभ कापली
पालनपूर (गुजरात) : लॉकडाऊनमुळे निराश होऊन घरी जाण्यास आतुर झालेल्या विवेक शर्मा (२४, रा. मोरेना, जिल्हा, मध्यप्रदेश) या मूर्तिकाराने गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मंदिरात स्वत:ची जीभ कापून घेतली, असे पोलिसांनी सांगितले. काही वृत्तांमध्ये त्याने देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी जीभ अर्पण केली, असा दावा केला असला तरी पोलिसांनी त्यांना दुजोरा दिलेला नाही.
‘नादेश्वरी खेड्यातील नादेश्वरी माताजी मंदिरात शनिवारी शर्मा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत होता. त्यावेळी त्याच्या हातात कापलेली जीभ होती. आम्ही त्याला तातडीने सुई गाम रुग्णालयात नेले,’ असे पोलीस म्हणाले. ज्या मंदिरात हा प्रकार घडला त्या मंदिराची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे.
शर्मा हा तेथून १४ किलोमीटरवरील मंदिरात कामाला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत विवेक शर्मा हा लॉकडाऊन लागू झाल्यापासून कमालीचा अस्वस्थ झाला होता आणि त्याला सतत घराची आठवण येत होती. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘शर्मा याने असा विचार केला असावा की, देवतेला जीभ अर्पण केल्यास परिस्थिती बदलेल व आपल्याला घरी जाता येईल.’ मात्र, पोलिसांनी शर्मा जोपर्यंत शुद्धीवर येत नाही व नेमके काय घडले, हे सांगणार नाही, तोपर्यंत जीभ अर्पण केल्याचा दावा मान्य करता येणार नाही, असे स्पष्ट केले.