Coronavirus:...अन् शेवटच्या क्षणी ऑक्सिजन सिलेंडर मिळाला पण खूप उशीर झाला; २ सख्खे भाऊ दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:30 AM2021-04-22T10:30:31+5:302021-04-22T10:42:31+5:30
प्रिटिंग प्रेस चालवणारे सुनील गहलोत आणि वकील असलेले नटवर गहलोत यांना १७ एप्रिलला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची समस्या जाणवली.
गाजियाबाद – राजधानी दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाजियाबाद येथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. स्थानिक प्रशासन परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत आहे. परंतु नोएडा बरौलामधील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनअभावी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
प्रिटिंग प्रेस चालवणारे सुनील गहलोत आणि वकील असलेले नटवर गहलोत यांना १७ एप्रिलला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची समस्या जाणवली. या दोघांची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली होती. परंतु कोविड टेस्ट केल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. कसंतरी अल्फा २ येथील नवीन रुग्णालयात दोघांना उपचारासाठी दाखल केले.
नटवरचे नातेवाईक नितीन यांनी सांगितले की, त्या दोघांची तब्येत बिघडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना ऑक्सिजनचा बंदोबस्त करण्यासाठी सूचना दिली. आम्ही अनेक ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर १० किलो सिलेंडर उपलब्ध करून रविवारी संध्याकाळी हॉस्पिटलकडे सुपूर्द केला. सोमवारी रात्री अचानक दोघांची तब्येत आणखी खालावली. सुनीलने रात्री ८ वाजता अखेरचा श्वास घेतला तर नटवरने पहाटे ४ वाजता दम तोडला.
गाजियाबाद आणि नोएडा येथे कमीत कमी १२ हॉस्पिटलमध्ये बुधवारी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या तक्रारी आल्या. नोएडा सेक्टर ३९ मध्ये सरकारी हॉस्पिटलची अवस्था बिकट आहे. सेक्टर २९ मध्ये भारद्वाज हॉस्पिटल, ग्रेटर नोएडामध्ये शर्मा आणि Promhex हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजनचा अभाव होता. गाजियाबादच्या इंदिरापुरम भागातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलची हीच अवस्था आहे. त्यांच्याकडे फक्त काही तासांचा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. शांती गोपाळ हॉस्पिटलध्ये एक रुग्णाच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा साठा कमी प्रमाणात शिल्लक असल्याचं आता कळालं. सर्व २५ रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची अवस्था खूप वाईट झाली आहे.