CoronaVirus: ‘त्या’ १८६ रुग्णांना संसर्ग कसा झाला?; आरोग्य यंत्रणेला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:45 AM2020-04-23T02:45:56+5:302020-04-23T07:05:41+5:30
लक्षणे नसतानाही रिपोर्टस् पॉझिटिव्ह; बाहेरदेशातूनही कोणी आलेले नाही, हे विशेष
नवी दिल्ली : देशभरात अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे नसतानाही त्यांचे रिपोर्टस् पॉझिटिव्ह येत आहेत; पण संक्रमणाची कारणे मात्र कळत आहेत. दिल्लीमध्ये अशा १८६ रुग्णांना मात्र संसर्ग कसा झाला, याचाच शोध अद्याप आरोग्य यंत्रणेला लागलेला नाही.
दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. त्याच वेळी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. दिल्लीत एकूण २ हजार १५६ रुग्ण असून, यातील १८६ रुग्णांमध्ये संक्रमणाचा शोध घेणे सुरू आहे. यांच्यापैकी कोणीही बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेला नाही किंवा संबंधितांच्या संपर्कातही आलेला नाही. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी कोरोना संशयिताच्या संपर्कातही हे लोक आलेले नाहीत. एवढेच नव्हे तर यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना त्यांचे रिपोर्टस् मात्र पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशा रुग्णांमुळे सरकारची चिंता मात्र वाढली आहे. कारण लक्षणे नसतानाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असेल तर यात सामुदायिक संक्रमणाचा धोका आहे. दुसरीकडे आरोग्यसेवक आणि पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे.
ज्या दोन यंत्रणांच्या भरवशावर रुग्णांवर उपचार आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे, त्यांनाच संसर्ग होत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. अपुºया पीपीई कीटस्ची समस्या अद्याप दूर झालेली नाही. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील इतर कर्मचारी साऱ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच चांदनी महल पोलीस स्टेशनसह दिल्लीतील इतर भागांमधील पंधराहून अधिक पोलिसांना संसर्ग झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणेलाही धोका निर्माण झाला आहे. तुघलकाबादमध्ये एका किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या ३५ लोकांना कोरोना झाला. यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीतही जोखीम निर्माण झाली आहे. मॉडेल टाऊन सर्कलमध्ये रूपनगर भागात एका सरकारी धान्य दुकानात काम करणाºया वृद्धाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे इथे धान्य खरेदी करायला येणाºया लोकांना स्थानबद्ध करून थेट संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू झाला आहे. या दुकानातून दीड हजारांहून अधिक लोक धान्य खरेदी करतात.
व्हिसाचे उल्लंघन करणारे ६१९ विदेशी नागरिक अटकेत
व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून भारतात राहणाऱ्या एकूण ६१९ विदेशी नागरिकांना ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतरच्या गेल्या महिनाभरात देशाच्या विविध राज्यांत अटक करण्यात आली आहे.
यापैकी बहुतांश विदेशी नागरिक हे दिल्लीत निजामुद्दीन मरकज येथे झालेल्या तबलिगी जमातच्या इज्तेमासाठी आलेले आहेत. पर्यटक व्हिसावर भारतात येऊन धर्मप्रचाराचे काम केल्याच्या आरोपावरून त्यांना ‘फॉरेनर्स अॅक्ट’ अन्वये अटक करण्यात आली आहे.
यापैकी बहुतांश लोक बांगलादेशचे असून, इतर इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कझागस्तान, किरगिझीस्तान व ताजिकीस्तान या देशांचे आहेत, अशी अटकेची ताजी कारवाई सोमवारी प्रयागराज शहरात करण्यात आली. तेथे १६ विदेशी नागरिकांना अटक केली गेली.
या अटकांची राज्यनिहाय आकडेवारी अशी आहे: उत्तर प्रदेश ३४१, महाराष्ट्र १५७, बिहार ६६, कर्नाटक ३४ व झारखंड २१. अन्य काही राज्यांत फक्त गुन्हे नोंदले आहेत; पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यानुसार तेलंगणात ८८, तामिळनाडू ७२, तर मध्यप्रदेशात ६३ विदेशी नागरिकांविरुद्ध अशा प्रकारचे गुन्हे नोंदले गेले आहेत.
इंदिरापुरममध्ये वृद्धेला संसर्ग
गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये आणखी एका वृद्ध महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ४७ झाली आहे. खासगी प्रयोगशाळेत या महिलेचे नमुने तपासण्यात आले होते. अद्याप १२६ चाचण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेले नाही.
रुग्णालयातील कर्मचाºयांचे आंदोलन
नोएडातील सेक्टर-२४ मध्ये ईएसआय रुग्णालयाचे कर्मचारी परिसरातच आंदोलन करीत आहेत. त्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळाले नाही, असा त्यांचा आरोप आहे. कोरोनामुळे उद््भवलेल्या परिस्थितीत कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी सरकारी रुग्णालयाचे वेतन झालेले नाही, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.