Coronavirus: दर सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कशी होते, जाणून घ्या आकडेवारी मागचं गणित?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 02:08 PM2021-05-10T14:08:42+5:302021-05-10T14:09:30+5:30
सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळते. पण तुम्ही कोरोनाच्या आकडेवारीकडे पाहिलं तर दरवेळी सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते
नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. यावेळी भारत कोरोनाच्या लाटेतील सर्वात प्रभावित देश आहे. जगभरातील सर्वात जास्त रुग्ण भारतात सापडत आहेत. एप्रिलपासून देशात कोरोनानं कहर केला आहे. मे महिन्यात कोरोना आणखी भयंकर स्वरुपात येण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. मे महिन्यापासून दिवसाला सरासरी ४ लाखापर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत.
परंतु सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळते. पण तुम्ही कोरोनाच्या आकडेवारीकडे पाहिलं तर दरवेळी सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते. त्यानंतर मंगळवार ते शुक्रवारपर्यंत अचानक ही संख्या वेगाने वाढते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ का होते यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया
सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट कशी होते?
देशात सध्या अडीच हजार लॅब आहेत. ज्याठिकाणी कोरोनाची चाचणी केली जाते. कोरोना संकट काळात सुरुवातीपासून आतापर्यंत लॅबची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतात सध्याच्या घडीला १७ ते १९ लाख लोकांची चाचणी दिवसाला केली जाते. परंतु सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट होण्यामागे चाचणी हेदेखील महत्त्वाचं कारण आहे.
देशातील विविध भागात सरकारी आणि खासगी लॅब रविवारी बंद राहतात. रविवारी फक्त काही लॅब सुरु असतात. त्यामुळे रविवारी चाचणी कमी केली जाते. जर रविवारी चाचण्यांची संख्या कमी असली तर सोमवारी रुग्णसंख्येत खूप मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून येते. जर तुम्ही मागील ५ सोमवारची आकडेवारी पाहिली तर त्याचा अंदाज येऊ शकतो.
१० मे – ३ लाख ६६ हजार ३१७ रुग्ण (सोमवार)
९ मे – १४ लाख ७४ हजार चाचणी(रविवार)
३ मे – ३ लाख ६८ हजार १४७ रुग्ण (सोमवार)
२ मे – १५ लाख चाचण्या(रविवार)
२६ एप्रिल – ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्ण (सोमवार)
२५ एप्रिल – १४ लाख चाचण्या(रविवार)
१९ एप्रिल – २ लाख ७३ हजार ८१० रुग्ण (सोमवार)
१८ एप्रिल – १३ लाख ५६ हजार चाचणी (रविवार)
१२ एप्रिल – १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण (सोमवार)
११ एप्रिल – १४ लाख चाचणी(रविवार)
सोमवारनंतर कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
देशात आठवड्याला सरासरी १ कोटी लोकांची चाचणी केली जाते. ज्यात आरटी पीसीआर आणि रॅपिड अँन्टिजेन चाचणी दोघांचाही समावेश असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी जास्त चाचण्या केल्या जातात. पण सुट्टीच्या दिवशी चाचण्यांची संख्या कमी होते. भारतात सध्या दिवसाला ४ लाख रुग्ण सापडत आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या आताही ३० लाखांच्या अधिक आहे.