Coronavirus : पर्यटनाने कोरोनाच्या लाटेचा धोका; हिमाचल प्रदेशात पर्यटकांची प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 08:29 AM2021-07-11T08:29:58+5:302021-07-11T08:31:47+5:30
Coronavirus In India : उत्तराखंड सरकारने घातले निर्बंध. मसुरी, नैनिताल, डेहराडून, हिमाचल प्रदेशातील सिमला, मनाली आदी ठिकाणी पर्यटकांनी प्रचंड गर्दी.
देशात कोरोनाची साथ कायम असतानाच उत्तराखंडमधील मसुरी, नैनिताल, डेहराडून, हिमाचल प्रदेशातील सिमला, मनाली आदी ठिकाणी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे तिथे साथ मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका आहे, असा इशारा केंद्र सरकारने दिला. नैनिताल, डेहराडून येथील हॉटेलांत एकूण निवासी क्षमतेपैकी फक्त ५० टक्के लोकांना राहता येईल, असे बंधन उत्तराखंड सरकारने घातले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी इशारा दिला की, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. उत्तराखंडमध्ये प्रतिबंधक नियम, प्रवासावरील बंधने शिथिल केल्यानंतर देशभरातून तिथे पर्यटकांचा ओघ वाढला. मात्र, प्रतिबंधक नियमांची ऐशीतैशी करून अनेक पर्यटक वावरत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर उत्तराखंड सरकार खडबडून जागे झाले. नैनिताल, मसुरी येथील दुकाने रविवारीही सुरू व मंगळवारी बंद राहतील. इतर ठिकाणी रविवार सोडून सर्व दिवशी दुकाने खुली ठेवण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. इतर राज्यांतून मसुरी येथे येणाऱ्या पर्यटकांनी आरटी-पीसीआर चाचणी करून घेणे उत्तराखंड सरकारने बंधनकारक केले आहे.
कोरोना संपलेला नाही, एखादी चूक पडेल महागात
केंद्रीय आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, साथीमुळे घरात बसून लोक कंटाळले होते. काही ठिकाणी प्रतिबंधक नियम शिथिल केल्यामुळे कोरोना विषाणूचा धोका आता उरलेला नाही असा अर्थ लोकांनी काढला आहे. मात्र, साथ अजून संपलेली नाही. एखादी लहान चूक महागात पडू शकते असाही इशारा त्यांनी दिला.
प्रतिबंधक नियम पाळा
हिमाचल प्रदेशमधील बहुतांश पर्यटनस्थळी असेच चित्र आहे. ही सारी स्थिती भयावह आहे, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, लोकप्रिय पर्यटनस्थळी लोकांनी प्रचंड गर्दी केली असून, ते प्रतिबंधक नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. लोकांनी सर्व प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
धीम्या लसीकरणाने साथीचा धोका कायम
जिनिव्हा : डेल्टा विषाणूचा प्रसार तसेच अनेक देशांत धीम्या गतीने होत असलेले लसीकरण, लोकांचे खबरदारी न घेताच आपसात मिसळणे वाढल्याने कोरोना साथीचा धोका पूर्वीइतकाच कायम आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.