CoronaVirus: बायको लुडोत जिंकल्याचा राग; नवऱ्यानं मोडलं पाठीचं हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:40 PM2020-04-27T13:40:13+5:302020-04-27T13:40:43+5:30
गुजरातच्या बडोद्यातला धक्कादायक प्रकार
वडोदरा: गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरू असल्यानं घरात राहून कंटाळलेले अनेक जण लुडो खेळण्यास पसंती देत आहेत. मात्र गुजरातमधल्या एक घरात लुडोमुळे मोठा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीनं पत्नीला मारहाण केली. त्यात तिच्या पाठीच्या कण्याचं हाड मोडलं. यानंतर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बडोद्यात हा प्रकार घडला.
१८१ अभयम हेल्पलाईनकडे तक्रार आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मारहाण झालेली महिला २४ वर्षांची असून ती वेमालीची रहिवासी असल्याची माहिती समुपदेशकांनी दिली. संबंधित महिला शिकवण्या घेते. तर तिचा पती इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉकडाऊन असल्यानं कंपनी आणि शिकवण्या बंद असल्यानं दोघेही घरीच असतात. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी ते लुडो खेळत होते.
पत्नीनं लुडो खेळताना सलग तीन-चार वेळा हरवलं. वारंवार हरलेल्या पतीनं पतीशी वाद घातला. त्यांच्याच कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण मारहाण करण्यापर्यंत पोहोचलं. पतीनं पत्नीला जबर मारहाण केली. त्यात तिच्या पाठीच्या कण्याचं हाड मोडलं. यानंतर चूक लक्षात आलेल्या पतीनं पत्नीला रुग्णालयात नेलं.
पत्नीनं रुग्णालयातून पतीच्या घरी जाण्यास नकार दिला. मात्र समुपदेशनांतर पतीनं पत्नीची माफी मागितली. त्यानंतर पत्नी घरी जाण्यास तयार झाली. मारहाण करणाऱ्या पतीला कडक शब्दांत समज देण्यात आल्याची माहिती अभयम हेल्पलाईनचे समन्वयक चंद्रकांत मकवाना यांनी दिली. यापुढे पत्नीवर हात उचलल्यास थेट कायदेशीर कारवाई करू असा इशारा पतीला देण्यात आला.