Coronavirus: “२०-२५ रात्री मी झोपलो नाही, ‘त्या’ रुग्णाचा चेहरा कधीच विसरणार नाही”; वाचा डॉक्टरचा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 12:11 PM2021-06-08T12:11:44+5:302021-06-08T12:13:54+5:30
Coronavirus: कोणी म्हणायचं माझा मुलगा आहे, कोणी माझे वडील आहेत प्लीज त्यांना कसंही करून वाचवा. आम्ही दिवसरात्रं आयसीयूमध्ये कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो.
नवी दिल्ली – डॉ. युद्धवीर सिंह एम्सच्या एनेस्थिसीया आणि क्रिटिकल केअरमध्ये असिस्टेंट प्रोफेसर आहेत. एम्समधील कोविड आयसीयूत मोठी जबाबदारी सांभाळून त्यांना एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. या महामारीच्या काळात त्यांना खूप काही बघावं लागलं. परंतु जे दुसऱ्या लाटेत पाहावं लागलं ते कधीच विसरू शकत नाही
डॉ. युद्धवीर सांगतात की, मार्च अखेर आणि एप्रिल २०२१ खूप त्रासदायक आणि तणावग्रस्त होता. रुग्णांची संख्या इतकी होती की त्यांचा सांभाळणं कठीण झालं. आजही मला ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. एप्रिलमध्ये माझे दोन्ही मोबाईल सातत्याने खणखणत होते. त्या भयानक काळात २०-२५ रात्री झोपही लागली नाही. प्रत्येकवेळी कॉल सुरूच होता. कोणाकडे ऑक्सिजन नाही, कोणी घरी उपचार कसे करायचे अशी विचारणा करत राहायचे. सल्ले दिले तर चिंता लागलेली असायची. इतकं हताश होतो की, हॉस्पिटलमध्ये कामाला असूनही कोणाला बेडदेखील देऊ शकत नव्हतो.
कोणी म्हणायचं माझा मुलगा आहे, कोणी माझे वडील आहेत प्लीज त्यांना कसंही करून वाचवा. आम्ही दिवसरात्रं आयसीयूमध्ये कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. अनेकदा संतप्त नातेवाईकांनी शिव्याही दिल्या. अशा संकटकाळी तेदेखील तणावात होते हे आम्हाला जाणवत होते. आम्ही पीपीई किट्समध्ये असायचो, कोणाशी संपर्क नाही. अनेक रुग्ण दगावत असल्याचं पाहून आम्हीदेखील कोलमडून पडायचो. एक युवक रुग्ण आठवतो तो नेहमी बोलत होता. आय विल फाइट बॅक सर, मी क्रिकेट खेळतो, रनिंगही केलं आहे. मला काही होणार नाही. अखेर आम्ही त्याला वाचवू शकलो नाही हा विचार करून मन दु:खी होतं.
त्याचवेळी माझी पत्नी जी अपोलो हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ होती. तीदेखील पॉझिटिव्ह आली. हा पीक टाइम होता. मला स्वत:ला लाज वाटत होती की पत्नी पॉझिटिव्ह आली असतानाही मी तिची साथ देऊ शकत नव्हतो. परंतु ती स्वत: एक डॉक्टर आहे तिने मला हिंमत दिली. प्रत्येक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचे मेसेज, कॉल्स पाहायला मिळत होते. सोशल मीडियातही लोक दुबईपर्यंत मदत मागत होते.
‘त्या’ दिवशी हताश झालो
एप्रिलमध्ये माझा एक मित्र एम्समध्ये डॉक्टर होता. त्याचा सख्खा भाऊ जो डॉक्टर आहे त्याला मदत हवी होती. परंतु आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. स्वत:च्या नातेवाईकांनाही जागा नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकत नव्हतो. जर बेड मिळाला नाही तर मी जीव देईन असं मित्र म्हणाला. निराश आणि हताश झालेले लोक औषधांसाठी बेडसाठी संघर्ष करताना दिसून आले. ऑक्सिजन, बेड्ससाठी कॉल यायचे. मला असं वाटायचं की आम्हाला ऑक्सिजनची गरज भासली तेव्हा मिळेल का? बेड मिळेल का? अखेर हे वादळ कधी संपणार असं मला सारखं वाटत होतं असं डॉक्टर युद्धवीर सिंह म्हणाले.
‘त्या’ रुग्णाचा चेहरा कधीच विसरू शकत नाही
डॉ. युद्धवीर यांनी एका रुग्णाबद्दल सांगितले की, तो एक फायटर रुग्ण होता. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु जेव्हा त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली त्यानंतर अचानक २५ दिवसांनी त्याची तब्येत ढासळली आणि तो गेला यावर मला विश्वास बसत नव्हता. त्याच्या बहिणीला सांगणंही मला कठीण झालं. जेव्हा एखादा रुग्ण बरा होत असतानाच अचानक जीव सोडतो तो क्षण आम्हा डॉक्टरांसाठी खूप कठीण असतो असं त्यांनी सांगितले.
कोरोनाला हलक्यात घेऊ नका
भलेही कोरोनाचा धोका आत्ता आपल्याला कमी वाटत असला, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी निष्काळजीपणा कधीच करू नका. कोरोना असा आजार आहे की ज्याच्याबद्दल काही अंदाज लावणं डॉक्टरांनाही जमलं नाही. कोणत्या व्यक्तीवर त्याचा कसा परिणाम होऊ शकेल याची माहिती नाही. जगभरात यावर रिसर्च सुरू आहे. तुम्ही लस घेतली असली तरी कोरोनापासून बचावासाठी उपाययोजना सोडू नका. मास्क लावल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. हात वारंवार सॅनिटायझ करा. सोशल डिस्टेंसिंगचं पालन कायम करा.