Coronavirus : वैज्ञानिकांना भारतातील वटवाघळांमध्ये सापडला 'बॅट कोरोना व्हायरस', पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 10:02 AM2020-04-15T10:02:27+5:302020-04-15T10:09:43+5:30
Coronavirus : अजूनही वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. अशात भारतीय वैज्ञानिकांनी भारतात आढळणाऱ्या वटवाघळांवर एक महत्वपूर्ण शोध केलाय.
कोरोनामुळे देशात जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 400च्या जवळ पोहोचली आहे. तर जगभरात या व्हायरसमुळे एक लाख 26 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अजूनही वैज्ञानिकांना यावर उपाय शोधण्यात यश आलेलं नाही.
असा दावा आधीपासून केला जात आहे की, हा व्हायरस वटवाघळाच्या माध्यमातून मनुष्यात शिरला. अजूनही वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. अशात भारतीय वैज्ञानिकांनी भारतात आढळणाऱ्या वटवाघळांवर एक महत्वपूर्ण शोध केलाय.
वैज्ञानिकांना केरळ, हिमाचल प्रदेश, पुदुचेरी आणि तामिळनाडूमधील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोरोना व्हायरस 'बॅट कोरोना व्हायरस' असल्याचे आढळून आले आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेत वैज्ञानिक आणि या रिसर्चच्या मुख्य लेखिका डॉ. प्रज्ञा डी. यादव यांनी सांगितले की, याचा काहीही स्पष्ट पुरावा किंवा रिसर्च नाही ज्यातून हा दावा केला जाईल की, 'बॅट कोरोना व्हायरस' मनुष्यांमध्ये आजार पसरवण्याचं कारण ठरतो.
केरळ, हिमाचल प्रदेश, पुदुचेरी आणि तामिळनाडूमध्ये रॉजेत्तुस आणि टेरोपस प्रजातीच्या 25 वटवाघुळात बॅट कोव पॉझिटिव्ह आढळून आलेत. यादव म्हणाल्या की, या बॅट कोरोना व्हायरसचा कोविड-19 महामारीशी काहीही संबंध नाही. पण त्यांनी असेही सांगितले की, टेरोपस प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये 2018 आणि 2019 मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरस आढळून आला होता.
या रिसर्चनुसार, असे मानले जाते की, वटवाघुळात नैसर्गिक रूपाने अनेक प्रकारचे व्हायरस असतात. ज्यातील काही मनुष्यांना आजारी करण्याची शक्यता असते. भारतात टेरोपस प्रजातीच्या वटवाघुळात आधी निपाह व्हायरस मिळाला होता. आता असा संशय आहे की, नुकतंच पसरलेलं संक्रमण कोविड-19 चा संबंध वटवाघुळांशी आहे.
हा भारतातील वटवाघुळांवर करण्यात आलेला महत्वपूर्ण रिसर्च इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.