coronavirus: लसनिर्मितीबाबत संतुलित धोरण स्वीकारण्याची सूचना, आयसीएमआरच्या भूमिकेवर केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:59 AM2020-07-05T02:59:38+5:302020-07-05T03:00:00+5:30
कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस प्रकल्पाला प्राधान्य देतानाच, या संशोधनाला अनेक महिने किंवा वर्षेही लागू शकतात हे लक्षात घेऊन संतुलित धोरण स्वीकारले पाहिजे असे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोरोना प्रतिबंधक लस १५ आॅगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्याची घोषणा इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने केल्यामुळे संशोधन क्षेत्रातून टीकेचा सूर व्यक्त झाला आहे.
आयसीएमआरने घोषणा केली त्याच दिवशी झायडस कॅडिला कंपनीने आपण बनविलेल्या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) यांनी परवानगी दिल्याचे जाहीर केले. हैदराबादच्या भारत बायोटेक तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस आयसीएमआरने तयार केलीे. प्रख्यात विषाणूतज्ज्ञ व वेलकम ट्रस्ट/डीबीटी इंडिया अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहिद जमील म्हणाले, एखादी लस संबंधित आजारावर परिणामकारक ठरते आहे की नाही याची चाचणी चार आठवड्यांत वेगाने पूर्ण करणे अशक्य गोष्ट आहे.
कोलकाताच्या सीएसआयआर-आयआयसीबी संस्थेतील विषाणूतज्ज्ञ उपासना रॉय यांनी सांगितले की, या लसीसंदर्भातील प्रयोगांच्या निष्कर्षांवर शांतपणे विचार करून मगच निर्णय घेतले पाहिजेत. विषाणूतज्ज्ञ सत्यजीत रथ यांनी सांगितले की, प्रत्येक संशोधनाला पुरेसा वेळ द्यावा लागतो, औषधाच्या चाचण्या योग्य पद्धतीने कराव्या लागतात. आयसीएमआरने घेतलेली भूमिका कोणालाही मान्य होणार नाही.