CoronaVirus : "जर ईश्वर आहे, तर कोरोनाचा नायनाट का करत नाही?"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 04:55 PM2020-04-13T16:55:14+5:302020-04-13T17:08:30+5:30
CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी ट्विट करत एक सवाल उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत देशात जवळपास नऊ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी ट्विट करत एक सवाल उपस्थित केला आहे.
मार्कंडेय काटजू यांनी केलेले ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले, "जर ईश्वर आहे, तर कोरोनाचा नायनाट का करत नाही?" मार्कंडेय काटजू यांच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचबरोबर, देशातील लॉकडाऊन वाढविण्यास सुद्धा मार्कंडेय काटजू यांनी विरोध दर्शविला आहे.
If there is a God why does he not eradicate corona ?
— Markandey Katju (@mkatju) April 13, 2020
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये सध्या ७ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर ३०८ जणांचा मृत्यू झाला असून ८५७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्ली, मुंबई, इंदूर आणि जयपूर याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु केले आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब या राज्यांसह काही राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.