CoronaVirus: अल्पदरातील कोरोना चाचणीचा शोध; आयजीआयबीच्या शास्त्रज्ञांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:40 AM2020-04-23T02:40:26+5:302020-04-23T06:59:19+5:30
इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजीने (आयजीआयबी) अल्प दरातील कोरोना चाचणीची पद्धत विकसित केली आहे.
नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजीने (आयजीआयबी) अल्प दरातील कोरोना चाचणीची पद्धत विकसित केली आहे. यामुळे कोरोनाची तपासणी करण्यासाठी कुठलेही महागडे यंत्र वापरण्याची गरज राहणार नाही. ‘फेलुदा’ असे या चाचणीला नाव देण्यात आले आहे.
केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आयजीआयबी ही संस्था कार्य करते. सत्यजित रे यांच्या कथेवरून या चाचणी पद्धतीला ‘फेलुदा’ असे नाव देण्यात आले आहे. शास्त्रज्ञ देबज्योती चक्रवर्ती आणि सौविक मेती यांनी या चाचणीचा शोध लावला आहे. अत्यंत साध्या पद्धतीने ‘सार्स कोविड २’ची तपासणी करण्यात यश आल्याचे आयजीआयबीचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी सांगितले.
गर्भवती तपासणी जशी केली जाते तशा पद्धतीने कोरोनाची तपासणी करता येणारी ही पद्धत आहे. पेपर स्ट्रीपच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचे अस्तित्व दिसते. एक तासापेक्षा कमी वेळेत ही चाचणी होऊ शकते.
न्यूक्लिक अॅसिडच्या माध्यमातून ही चाचणी पार पडते. जर ही चाचणी व्यावसायिकरीत्या यशस्वी झाली, तर त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. कुठल्याही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये ही चाचणी होऊ शकणार आहे. महागडे पीसीआर मशिन्स या चाचणीसाठी लागत नाहीत.
अत्यंत साध्या पद्धतीची थर्मो ब्लॉक असलेली चीप केवळ आवश्यक असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. एमआयटी, बरकले विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठानेही वेगळे तंत्रज्ञान वापरून अशी चाचणी विकसित केली आहे. त्यामुळे या चाचणीचे वेगळेपण सिद्ध होण्यासाठी तिचे नाव ‘फेलुदा’ ठेवण्यात आल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.
हवाई वाहतूक मंत्रालय सील
हवाई वाहतूक मंत्रालयातील कर्मचाºयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राजीव भवन सील करण्यात आले आहे. राजीव भवनाच्या इमारतीतून मंत्रालयाचे काम चालते. नवी दिल्ली महानगरपालिकेने संपूर्ण मंत्रालयात औषध फवारणी केली. संबंधित कर्मचारी १५ एप्रिल रोजी कार्यालयात आला होता. त्यानंतर सात दिवसांनी त्यास कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. तात्काळ याची सूचना हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी व सचिवांना देण्यात आली. सचिवांनी इमारत सील केली. कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन आदेश देण्यात आला आहे.