CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:40 PM2021-07-19T18:40:58+5:302021-07-19T18:43:32+5:30
CoronaVirus : आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल.
Covid-19 third wave : देशासह जगभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट मोठी होती. यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा तिसऱ्या लाटेत येऊ नये आणि त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. तसेच, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. (iit kanpur claims third wave of coronavirus will be less dangerous)
आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, तिसर्या लाटेचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही गेल्या एका महिन्यात आमच्या मॉडेलच्या आधारे बरीच गणना केली आहे. यामध्ये असे निदर्शनास आले की, तिसरी लाट दुसर्या लाटेप्रमाणे इतकी प्रभावशाली नसेल. यात आम्ही तीन शक्यता वर्तविल्या आहेत. जर ऑगस्टच्या अखेरीस एखादा नवीन व्हेरिएंट आला, जो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने पसरेल, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरी लाट येईल. तिसरी लाट पहिल्या लाटेप्रमाणे असेल.
डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता कमी
प्रोफेसर अग्रवाल यांनी सांगितले की, डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसरी लाट भारतात येईल, अशी शक्यता कमी वाटते. जर भारतात डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणारा एखादा नवीन व्हेरिएंट आला तर काही प्रमाणात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आम्ही दोन गोष्टी विचारात घेतल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना संसर्ग झाला आहे ते बरे झाले. त्यांच्यातील काही लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. हे गेल्या वर्षाच्या अनेक अभ्यासात समोर आले आहे. 5 ते 20 टक्के लोकांची प्रतिकारशक्ती कोरोनाचा सामना करण्यासाठी संपली आहे. ज्यामुळे त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या, नेमका काय आहे 'हा' व्हायरस? #Norovirus#COVID19https://t.co/DBI2ohwoLl
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021
कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाचा इशारा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली आहे. तसेच, लहान मुलांना कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. देशातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर गेल्या शुक्रवारी (दि.16) आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. याचबरोबर, अजूनही 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट नोंदवणाऱ्या देशातील जिल्ह्यांविषयी आरोग्य मंत्रालयाने सावधगिरी व्यक्त केली असून कोरोना व्हायरस अजून संपला नसल्याचे म्हटले आहे.