CoronaVirus In India: गर्दीच्या ठिकाणी मास्क अन् सोशल डिस्टन्सिंग; केंद्र सरकारने राज्यांना दिले महत्वाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:57 PM2022-12-22T18:57:37+5:302022-12-22T18:58:34+5:30
CoronaVirus In India: गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत.
नवी दिल्ली: चीन, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली. येथे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचाही तुटवडा भासू लागला आहे. Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले ४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे.
गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत दिली. मनसुख मांडवीय म्हणाले की, आरोग्य मंत्रालय जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी राज्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यांना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून देशात कोणताही नवीन प्रकार आला तर त्याची वेळीच ओळख करून घेऊन पावले उचलता येतील. येत्या सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क राहून मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असं आवाहन मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.
In the wake of festive & new year season, states are advised to make sure people wear masks, use sanitisers and maintain social distancing along with increasing awareness for precautionary doses: Union Health minister Mansukh Mandaviya in LS pic.twitter.com/z3AjWxabJs
— ANI (@ANI) December 22, 2022
चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!
दरम्यान, गेल्या २४ तासांत सापडलेल्या १८५ रुग्णांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ कोटी, ४६ लाख, ७६ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४०२ एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ३० हजार ६८१ वर पोहोचली आहे.
२२०.०३ कोटी डोस-
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात लसीकरण अभियानामधून आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे २२०.०३ कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतात १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर पोहोचली आहे. तर ४ मे २०२१ रोजी ही रुग्णसंख्या दोन कोटींवर पोहोचली होती. २३ जून २०२१ रोजी या रुग्णसंख्येने ३ कोटींचा आकडा ओलांडला होता. तर २५ जानेवारी २०२२ रोजी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींवर पोहोचली होती.
भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही- डॉ. रवी गोडसे
जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. याशिवाय जपान, अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही नागरिकांवर भीतीचं सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही, असं डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असं मत रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"