Coronavirus : ‘त्वरित टेस्ट वाढवा, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना दिली महत्त्वपूर्ण सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:02 PM2022-01-18T18:02:15+5:302022-01-18T18:03:22+5:30
Coronavirus India : देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत.
नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. आज कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये काहीशी घट झाली आहे. आज देशात कोरोनाचे २ लाख ३८ हजार १८ रुग्ण सापडले. तर ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ९ हजार पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सक्रिय झाले असून, केंद्राने राज्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.
देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू असली तरी दिलासादायक बाब म्हणजे आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या फार कमी आहे. तज्ज्ञांच्या मते प्रत्येक बाधिताच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग शक्य नाही आहे. मात्र या लाटेतील बहुतांश रुग्ण हे ओमायक्रॉनचेच आहेत.
सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार संसर्गाचा दैनंदिन दर हा १९.६५ टक्के आणि साप्ताहिक दर १४.४१ टक्के एवढा नोंद झाला आहे. देशामध्ये आतापर्यंत एकूण ३ कोटी ५३ लाख,९४ हजार, ८८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर १.३० टक्के एवढा आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमधील दाव्यानुसार भारतामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक हा पुढच्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेरीस येऊ शकतो.