CoronaVirus: कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाण्याचा धोका; 'त्या' अहवालानं वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 03:09 PM2020-04-10T15:09:21+5:302020-04-10T15:13:55+5:30
CoronaVirus सामुहिक संसर्गाचा धोका वाढल्यानं कोरोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर
नवी दिल्ली: चीनमधील जगभरात पोहोचलेल्या कोरोना विषाणूनं भारतातही थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ४१२ वर पोहोचली असून मृतांचा आकडा १९९ इतका झाला आहे. कोरोनाचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चनं याबद्दलचे संकेत दिले आहेत. देशातील कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाण्याचा धोका वाढल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून आयसीएमआरनं विविध जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांचे नमुने आणि त्यांची पार्श्वभूमी याबद्दलची माहिती गोळा केली. यातील आकडेवारीचा अभ्यास करून आयसीएमआरनं धोक्याचा इशारा दिला आहे. देशात सामुहिक संसर्गाचा धोका वेगानं वाढत असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आयसीएमआरनं देशात सामुहिक संसर्गाचा धोका जवळपास नसल्याचं म्हटलं होतं.
आयसीएमआरनं १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान देशात आढळून आलेल्या ५ हजार ९११ कोरोना संक्रमितांचा अभ्यास केला. यातील १०४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे रुग्ण २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५२ जिल्ह्यांमधले होते. १०४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४० जणांनी कधीही परदेश प्रवास केलेला नव्हता. याशिवाय ते परदेशातून आलेल्या कोणाच्याही संपर्कात आले नव्हते. त्यामुळे कोरोनाचं संकट तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याचं आयसीएमआरनं म्हटलं आहे.