Coronavirus: स्थलांतरित मजूर, विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी वाढता दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 01:56 AM2020-04-22T01:56:28+5:302020-04-22T06:52:48+5:30
अनेक राज्यांची खास व्यवस्था करण्याची तयारी
नवी दिल्ली : राजस्थानात कोटा येथील स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या व ‘लॉकडाऊन’मुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना खास बसेसची व्यवस्था करून उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांत परत नेल्यानंतर इतरही राज्यांवर परराज्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी व स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी वाढता दबाव येत आहे. अनेक राज्यांनी त्यासाठी खास व्यवस्था करण्याची तयारी दाखविली असून, केंद्राने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.
उत्तर प्रदेश व उत्तराखंडनंतर आता मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, प. बंगाल, आसाम व झारखंड ही राज्येही राजस्थानमध्ये अडकलेल्या आपापल्या विद्यार्थ्यांना घरी परत नेण्याची व्यवस्था करण्याच्या तयारीला लागली आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून अन्य राज्यांमध्ये अडकून पडलेल्या त्यांच्या राज्यातील लोकांची अडचण सोडविण्याची त्यांना गळ घातली. अनेक राज्यांनी हा विषय मांडला असून, लवकरच यावर निर्णय घेऊ, असे शहा यांनी सांगितल्याचे गेहलोत म्हणाले.
गेहलोत असेही म्हणाले की, ऐनवेळी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याआधी केंद्र सरकारने उद्योगधंद्यानिमित्त असे घराबाबेर फिरणाºया लोकांना घरी परत जाण्यासाठी चार-पाच दिवसांचा वेळ द्यायला हवा होता. भारत सरकार अन्य देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना विशेष विमाने पाठवून परत आणते व अन्य देशांनाही भारतात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना विशेष विमाने करून मायदेशी परत नेऊ देते, तर सरकारने राज्यांनाही तशी परवानगी द्यायला हवी.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही अशीच भावना बोलून दाखविली. ते म्हणाले की, परराज्यांमध्ये अडकलेल्या माझ्या राज्यातील लोकांना परत आणण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा आग्रह मी केंद्राकडे धरणार आहे. हिमाचल प्रदेश व मध्यप्रदेश सरकारांकडेही नागरिकांकडून अशीच मागणी सातत्याने केली जात आहे, असे त्या राज्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजस्थानातील ५ लाख स्थलांतरित लोक अडकले
राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, कामधंद्यानिमित्त गेलेले राजस्थानमधील सुमारे पाच लाख स्थलांतरित कामगार, छोटे दुकानदार व व्यापारी व खासगी नोकरदार आसाम, प. बंगाल, ईशान्येकडील अन्य राज्ये, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, केरळ व महाराष्ट्रासह अन्य राज्यांत अडकून पडले आहेत.
महिनाभर घराबाहेर राहिल्याने ते हताश झाले असून, घरी परतण्यास आतुर झाले आहेत. ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने कामधंद्याला लागण्यापूर्वी आधी त्यांना आपापल्या घरी जाऊन मानसिक शांतता मिळणे अत्यंत गरजेचे आहे.