12th Class Exam: कोरोना काळातच होणार 12वीची परीक्षा? 19 विषयांची करण्यात आली निवड, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:58 PM2021-05-23T13:58:37+5:302021-05-23T14:01:11+5:30
केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त बैठकीत, 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्यात यावी, की नको? जर नाही, तर कुठला मार्ग काढावा? यावर चर्चा झाली.
नवी दिल्ली - देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यातच 12वीच्या परीक्षेसंदर्भात मोठे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना काळातच 12वीच्या परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी 19 विषयांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री, सर्व राज्य सरकारांचे शिक्षणमंत्री आणि सचिव यांची आज उच्च स्थरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनीच 12वीच्या परिक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यावरच विद्यार्थ्यांचे पुढचे भविष्य ठरेल, असा प्रस्ताव मांडला.
परीक्षा घेतली गेली नाही, तर कुठला मार्ग? बैठकीत चर्चा -
केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त बैठकीत, 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्यात यावी, की नको? जर नाही, तर कुठला मार्ग काढावा? यावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या या बैठकीत, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी, प्रकाश जावडेकर तथा सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, परीक्षेचे आयोजन करणाऱ्या बोर्डोंचे अध्यक्ष आणि परीक्षेशी संबंधित इतर संस्थांचे अधिकारीही सहभागी झाले होते.
सर्व पैलूंवर विचार करण्याची केंद्राची इच्छा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांतील शिक्षण बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसईने 12वीच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. याच बरोबर, एनटीएसह राष्ट्रीय परीक्षांचे आयोजन करणाऱ्या संस्थांनीही परीक्षा स्थगित केल्या आहेत. तर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक 30 मेरोजी परीक्षांसंदर्भात पुढील योजनांसंदर्भात सांगण्यात येईल, असे म्हटले होते. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी, सर्व पैलूंवर विचार करण्याची केंद्राची इच्छा आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक आठवड्यापूर्वीही राज्यांतील शिक्षा सचिवांसोबत बैठक केली आहे.