CoronaVirus: अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली; प्रसाराचा वेग स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:53 AM2020-04-24T05:53:21+5:302020-04-24T07:06:26+5:30
५ लाख कोरोना चाचण्यांमागे २० हजार रुग्ण; भारताचे धोरण प्रभावी ठरल्याचा दावा
नवी दिल्ली : कोरोनासाठी संशयितांची चाचणी करण्याचे भारताचे धोरण (स्ट्रॅटेजी) योग्य ठरल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २३ मार्चला १४,९५९ जणांचे नमुने तपासले असता रुग्णसंख्या ४०० वर पोहोचली, तर २२ एप्रिलपर्यंत ५ लाख नमुने तपासल्यानंतर २२ हजार रुग्ण आढळले. इतर देशांच्या तुलनेत भारतात ५ लाख चाचण्यांमागे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे प्रमाण ४.५ टक्के आहे. अमेरिकेत २६ मार्चला ५ लाख चाचण्यांनंतर ८० हजार रुग्ण सापडले होते. यावरून जगाच्या तुलनेत भारताचे धोरण आतापर्यंत प्रभावी ठरल्याचा दावा पर्यावरण सचिव व एमपॉवर्ड ग्रुप-२ चे अध्यक्ष सी. के. मिश्रा यांनी केला.
लॉकडाउनच्या तीस दिवसांमध्ये आपण रुग्णांपर्यंत पोहोचलो. कोरोना प्रसाराची साखळी रोखू शकलो. जगभरापेक्षा भारतात कोरोना प्रसाराचा वेग बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचेही ते म्हणाले. गेल्या तीस दिवसांचा आढावा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला. मिश्रा म्हणाले, तीस दिवसांच्या लॉकडाउनमध्ये भारताने चाचणी क्षमता ३३ पटींनी वाढवली आहे.
१७० हॉटस्पॉट जिल्ह्यांत लॉकडाउन वाढणार?
देशातील २० राज्यांमध्ये कोरोनाचे १७० जिल्हे हॉटस्पॉट (रेड झोन) असून, तिथे ३ मेनंतर लॉकडाउन वाढवावा. अन्य ठिकाणीही तो एकदम नव्हे, तर टप्प्याटप्प्याने शिथिल करूनच हटवावा, अशी शिफारस टास्क फोर्सने केली आहे.
महाराष्ट्र, दिल्लीसह सहा राज्यांत लॉकडाउन निष्प्रभ?
नवी दिल्ली: लॉकडाउनच्या पाचव्या आठवड्यांतरही कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख रोखण्यात महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील सहा राज्यांना अपयश आले आहे. या सर्व राज्यांमधील स्थिती चिंताजनक असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम अजूनच कठोर केले जातील.
अमरनाथ यात्रा यंदा होणारच
अमरनाथ यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी मागे घेतला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ही यात्रा जून महिन्यात होईल. कोरोना संसर्गाच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा यावर्षी रद्द करण्याचे सरकारने बुधवारी ठरविले होते. या यात्रेला देशातून दरवर्षी लाखो भाविक जातात.
बरे होण्याचे प्रमाण १९.८९ टक्क्यांवर
सकारात्मक बाब म्हणजे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण १९.८९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
मागील आठवड्यात ते १४ टक्के होते.
बुधवारपर्यंत देशात रुग्णसंख्या २१ हजार ३९३ होती. त्यातील ४२५७ जण पूर्णपणे
बरे होऊन घरी परतले.
१६४५२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
३८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६८१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ४१ जणांचा मृत्यू बुधवारी झाला.
बुधवारी १४०९ नवे रुग्ण देशभरात आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.