CoronaVirus News: कोरोनाचा वाढता विळखा! देशातील रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 09:13 PM2020-07-16T21:13:58+5:302020-07-16T21:28:12+5:30
CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला दर दिवशी ३० हजारांहून जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. आता देशात दररोज ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. काल दिवसभरात देशात ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. Covid19india.org या संकेतस्थळानुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.
आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६ इतकी होती. तर कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा २४ हजार ९१५ इतका होता. आतापर्यंत ६ लाख १२ हजार ८१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र दिवस संपता संपता देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उद्या सकाळी याबद्दलची माहिती दिली जाईल.
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर गेलं आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून येतात. त्यातल्या केवळ ०.३२ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची, तर ३ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते, अशी माहिती हर्षवर्धन यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.